‘मॅगी’बंदी उठली!

By admin | Published: August 14, 2015 02:19 AM2015-08-14T02:19:13+5:302015-08-14T02:38:41+5:30

देशभरातील मुलांचा अत्यंत आवडता तयार अल्पोपाहार असलेल्या नेस्ले इंडिया कंपनीच्या ‘टू मिनिट्स मॅगी नूडल्स’वर केंद्र आणि राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी घातलेली

Maggi rocks up! | ‘मॅगी’बंदी उठली!

‘मॅगी’बंदी उठली!

Next

मुंबई : देशभरातील मुलांचा अत्यंत आवडता तयार अल्पोपाहार असलेल्या नेस्ले इंडिया कंपनीच्या ‘टू मिनिट्स मॅगी नूडल्स’वर केंद्र आणि राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी घातलेली बंदी मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केली. तरीही मॅगी नूडल्स लगेच पुन्हा बाजारात येणार नाही. या नूडल्सच्या नमुन्यांची पुन्हा चाचणी करून घ्यावी व त्यातून हे खाद्यान्न सेवनासाठी अपायकारक नाही असे निष्पन्न झाले तरच कंपनीला हे उत्पादन पुन्हा विक्रीसाठी बाजारात आणता येईल. नेस्ले इंडिया कंपनीच्या नऊ विविध स्वाद आणि चवीच्या मॅगी नूडल्स बाजारात उपलब्ध होत्या. यात स्वत:ची अशी कोणतीही चव नसलेल्या मैद्याच्या नूडल्स आणि त्यांना चव आणण्यासाठी स्वतंत्रपणे दिलेले मसाल्याचे पाकीट असायचे. या नूडल्सच्या वर्षभरापूर्वी उत्तर प्रदेशात घेतलेल्या नमुन्यांमध्ये शिशाचे प्रमाण अधिक असल्याचे व मसाल्याच्या पाकिटात ‘अजिनो मोटो’ असल्याचे दिसून आले होते. यावरून राष्ट्रीय अन्नसुरक्षा व मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) व राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्व नऊ प्रकारच्या मॅगी नूडल्सवर बंदी घातली होती. या बंदीच्या एक दिवस आधीच नेस्ले इंडिया कंपनीने मॅगीचा सर्व साठा बाजारातून स्वत:हून परत घेतला होता. त्यानंतर कंपनीने या बंदीच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका केली. न्या. विद्यासागर कानडे आणि न्या. बी.पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठाने ही याचिका मंजूर करून बंदी आदेश रद्द केला. कंपनीने अनेक मुद्दे मांडले असले तरी अन्नसुरक्षा प्राधिकरणाने हा निर्णय घेताना नैसर्गिक न्याय तत्त्वांचे पालन केले नाही, एवढा एकच मुद्दा बंदी रद्द करण्यास पुरेसा आहे, असे न्यायालयाने म्हटले. बंदीनंतर कंपनीने या नूडल्सचा बाजारातून परत घेतलेला २५ हजार टन साठा जाळून नष्ट केला असला तरी त्यावेळी उत्पादन केलेल्या सर्व प्रकारच्या नूडल्सचे ७५० नमुने जपून ठेवले आहेत. अन्न सुरक्षा प्राधिकरणाने त्यातील पाच प्रकारच्या नूडल्सचे प्रत्येकी तीन नमुने घेऊन त्यांची पंजाब, आंध्र व जयपूर येथील प्रयोगशाळांकडून चाचण्या केल्या जाव्यात. या प्रयोगशाळा ‘नॅशनल अ‍ॅक्रिडिशन बोर्ड फॉर टेस्टिंग अ‍ॅण्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरिज’ने मान्यता दिलेल्या आहेत. या चाचण्यांमधून मॅगी नूडल्समध्ये शिशाचे प्रमाण निर्धारित पातळीहून जास्त नाही असे निष्पन्न झाले तरच हे उत्पादन पुन्हा बाजारात व्रिक्रीसाठी आणता येईल, असे न्यायालयाने म्हटले. या चाचण्या सहा आठवड्यांत करायच्या आहेत. अन्न सुरक्षा प्राधिकरणाने या निकालास स्थगिती देण्याची विनंती केली. मात्र कंपनीने बंदीच्या आधीच माल बाजारातून काढून घेतला होता व आताही तो लगेच बाजारात येणार नाही. त्यामुळे स्थगिती द्यायची गरज नाही, असे न्यायालयाने म्हटले. अन्न सुरक्षा प्राधिकरणाने या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी केल्याचे वृत्त आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Maggi rocks up!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.