तिन्ही प्रयोगशाळांमधील चाचणीत मॅगी सुरक्षित - नेस्लेचा दावा
By Admin | Published: October 16, 2015 02:26 PM2015-10-16T14:26:28+5:302015-10-16T14:27:10+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मॅगी नूडल्सच्या नमून्यांची तीन प्रयोगशाळांमधील तपासणीच्या अहवालात मॅगी सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा दावा 'नेस्ले' कंपनीने केला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मॅगी नूडल्सच्या नमून्यांची तीन प्रयोगशाळांमधील तपासणीच्या अहवालात मॅगी सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा दावा 'नेस्ले' कंपनीने केला आहे.
नेस्ले इंडिया कंपनीच्या ‘टू मिनिट्स मॅगी नूडल्स’वर केंद्र आणि राज्य सरकारने घातलेली बंदी मुंबई उच्च न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात सशर्त उठवली होती. या नूडल्सच्या नमुन्यांची पुन्हा चाचणी करून घ्यावी व त्यातून हे खाद्यान्न सेवनासाठी अपायकारक नाही असे निष्पन्न झाले तरच कंपनीला हे उत्पादन पुन्हा विक्रीसाठी बाजारात आणता येईल, असे न्यायालयाने म्हटले होते. मोहाली (पंजाब), हैदराबाद व जयपूर येथील प्रयोगशाळांमध्ये मॅगी नूडल्सची प्रत्येकी पाच सँपल्स चाचणीसाठी पाठवण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता.
त्यानुसार या तिनही प्रयोगशाळांमध्ये मॅगीच्या नमून्यांची चाचणी करण्यात आली असून ती सुरक्षित आहे, असा दावा नेस्ले कंपनीने आज झालेल्या सुनावणीदरम्यान केला. त्यामुळे आता मॅगी पुन्हा बाजारात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. थोड्याच काळात नेस्ले कंपनी मॅगी नव्याने लाँच करणार असल्याचे समजते.