वांद्रेत आज दीड हजार सौरचुलींवर शिजणार मॅगी
By admin | Published: January 15, 2015 05:24 AM2015-01-15T05:24:16+5:302015-01-15T05:24:16+5:30
बच्चेकंपनीपासून मोठ्यांची आवडती ‘दो मिनिट’वाली मॅगी उद्या सौरचुलीवर शिजवली जाणार आहे. मकर संक्रांतीनिमित्त वांद्रे येथील
मुंबई : बच्चेकंपनीपासून मोठ्यांची आवडती ‘दो मिनिट’वाली मॅगी उद्या सौरचुलीवर शिजवली जाणार आहे. मकर संक्रांतीनिमित्त वांद्रे येथील पटवर्धन मैदानावर तब्बल पंधराशे मुले सौरऊर्जेवर मॅगी बनविण्याचा प्रयोग करणार आहेत.
केशवसृष्टी आणि वांद्रे हिंदू असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ऊर्जा बचत आणि स्वच्छ भारत अभियानाचा संदेश देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमास राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, खा. पूनम महाजन, आ. आशिष शेलार आदी नेते उपस्थित राहणार आहेत.
तब्बल १५०० बच्चेकंपनी एकत्र येऊन उद्या पटवर्धन गार्डनमध्ये सौरऊर्जेच्या किटवर मॅगी शिजवण्याचा आनंद लुटणार आहेत. वांद्रे पश्चिमेला नॅशनल कॉलेजसमोरील पटवर्धन गार्डनमध्ये स. ९ वाजता १५०० शालेय विद्याथी एकाचवेळी सौरऊर्जेवर चालणाऱ्या किटवर स्वत:च मॅगी शिजवणार आहेत. यात शंभर विद्यार्थी महापालिका शाळांमधील असून ५० अपंग विद्यार्थीही असतील. प्रत्येक विद्यार्थ्याला सोलार किट देण्यात येणार आहे. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात ते घरी नेण्याची सोय असून दीडशे विद्यार्थ्यांना हा किट मोफत दिला जाईल. (प्रतिनिधी)