गणेशभक्तांचा महापूर
By admin | Published: September 21, 2015 02:47 AM2015-09-21T02:47:58+5:302015-09-21T14:38:17+5:30
गणेशोत्सवाच्या पहिल्याच रविवारी असलेल्या पावसाची रिपरिप आणि मेगाब्लॉकच्या संकटावर मात करीत मुंबईकरांनी गणपती पाहण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी केली होती
मुंबई : गणेशोत्सवाच्या पहिल्याच रविवारी असलेल्या पावसाची रिपरिप आणि मेगाब्लॉकच्या संकटावर मात करीत मुंबईकरांनी गणपती पाहण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी केली होती. उपनगरांकडून शहराकडे येणाऱ्या गणेशभक्तांचा महापूर पोलिसांनी शिस्तबद्ध पद्धतीने नियंत्रित केला.
पाऊस आणि मेगाब्लॉकमुळे मंडळांना भक्तांची गर्दी होणार का, याबाबत हुरहुर लागली होती. मात्र पुढील रविवारी बाप्पांचे विसर्जन होणार असल्याने सर्वच भक्तांनी मिळेल त्या साधनाने शहराकडे धाव घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. लालबाग, परळ, भायखळा, फोर्ट, विलेपार्ले, चेंबूर, कुर्ला अशा शहर आणि उपनगरांतील महत्त्वाच्या ठिकाणी गणपतीचा जयजयकार ऐकायला आला.
सकाळपासून असलेल्या गर्दीत सायंकाळनंतर मात्र वेगाने वाढ दिसली. मात्र नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या नियंत्रणामुळे गर्दीला आवरण्यात वाहतूक पोलिसांना यश आले. मुख्यत: लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग वाहनांसाठी सकाळपासूनच बंद ठेवण्यात आला होता. त्याला पर्यायी मार्ग म्हणून करी रोड पुलावरून ना. म. जोशी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली होती. तर दुसरा पर्यायी मार्ग म्हणून काळाचौकीच्या बेस्ट कर्मचारी वसाहतीकडून आंबेवाडी मार्गाने परावर्तन देण्यात आले होते.
‘टेंपल रन’ची धमाल
काळाचौकीचा महागणपती येथे टेंपल रन या मोबाइल गेमची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. बच्चेकंपनीने धमाल करण्यासाठी या ठिकाणी गर्दी केल्याचे चित्र होते, तर तरुणांनीही सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती.
एनएसएसचे पथनाट्य
गणेशोत्सवात जमणाऱ्या गर्दीपर्यंत पथनाट्याच्या मदतीने सामाजिक संदेश पोचवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत (एनएसएस) विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी रविवारी रस्त्यावर उतरले होते. रुपारेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काळाचौकीला, तर महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राणीबागेत पथनाट्याच्या मदतीने लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम केले.
शास्त्री हॉल सार्वजनिक श्रीगणेशोत्सव
कोणाशीही स्पर्धा न करता प्रत्येकवर्षी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवाच्या काळात बौद्धिक स्पर्धांचे आयोजन केले जाते. यात लहान मुलांसाठी स्तोत्र पाठांतर, श्लोक पाठांतर स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामुळे लहान वयातच मुलांना आपली संस्कृती, परंपरा याची ओळख होते. ठरलेल्या आरत्या त्याच क्रमाने आणि तालासुरात केल्या जातात. मंडळाचे कामकाज पाहायला विविध समित्यांची स्थापना केली आहे. सर्व कार्यकर्ते वर्गीकरण करून काम करतात, अशी माहिती मंडळाचे स्पर्धा समन्वयक गणेश आचवल यांनी दिली.