Jitendra Awhad: मोठी बातमी! राज्यातील सर्व कोरोना निर्बंध हटवले; गुढीपाडवा, रमजान, आंबेडकर जयंती जोरात साजरी करा, आव्हाडांचं ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 05:23 PM2022-03-31T17:23:53+5:302022-03-31T17:24:14+5:30
Jitendra Awhad राज्यात कोरोनामुळे लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध उठवण्यात आले असून गुढीपाडवा, रमजान आणि आंबेडकर जयंती जोरात साजरी करा असं ट्विट राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
मुंबई-
राज्यात कोरोनामुळे लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध उठवण्यात आले असून गुढीपाडवा, रमजान आणि आंबेडकर जयंती जोरात साजरी करा असं ट्विट राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांनी केलं आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत कोरोनाचे सर्व निर्बंध उठवण्याचा सर्वानुमते निर्णय झाल्याचं आव्हाडांनी म्हटलं आहे.
राज्यात कोरोना परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. त्यामुळे निर्बंधांमध्ये शिथिलता द्यावी अशी मागणी अनेक स्तरांतून केली जात होती. तसंच सध्या सण-उत्सवांचा काळ सुरू होत असल्यानं यंदा तरी सण उत्साहात साजरे करायला मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. राज्यातील कोरोना निर्बंधांबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनामुळे लागू असलेले निर्बंध उठवण्याबाबतचा निर्णय झाल्याची माहिती ट्विटरवरुन दिली आहे.
"आज मंत्रीमंडळात कोरोना चे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले. गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा, रमजान उत्साहात साजरा करा, बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा", असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
आज मंत्रीमंडळात कोरोना चे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले ......
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 31, 2022
गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा
रमजान उत्सहात साजरा करा
बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा
दरम्यान, राज्यातील कोरोना निर्बंध मागे घेण्यात आले असले तरी कोरोना प्रतिबंधक उपायांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. यात मास्क वापरणं ऐच्छिक असणार असल्याचाही निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे.