MNS Raju Patil: मनसेच्या एका मतासाठी मविआ आणि भाजपाची फिल्डिंग, फोन खणाणले!; राजू दादा म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 01:46 PM2022-06-20T13:46:40+5:302022-06-20T13:47:16+5:30
राज्याच्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान सुरू आहे. १० जागांसाठी ११ उमेदवर रिंगणात असल्यानं दहाव्या जागेवर चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
मुंबई-
राज्याच्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान सुरू आहे. १० जागांसाठी ११ उमेदवर रिंगणात असल्यानं दहाव्या जागेवर चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांच्या लढाईत छोटे पक्ष, अपक्षांच्या मताला मोठं महत्व प्राप्त झालं आहे. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) एका मतासाठी भाजपासोबतच महाविकास आघाडीनं देखील फिल्डिंग लावल्याची माहिती समोर आली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी झालेल्या पराभवाचा धसका महाविकास आघाडीनं घेतला असून यावेळी ठाकरे सरकारकडून राजू पाटील यांनाही मतदानासाठी गळ घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण ग्रामीणचे मनसचे आमदार राजू पाटील यांना आपल्या बाजूनं घेण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपा नेत्यांची फोनाफोनी सुरू आहे.
विधान परिषद निवडणूक मतदानाचे LIVE UPDATES येथे क्लिक करा
मनसेचे आमदार राजू पाटील मतदानासाठी मुंबईच्या दिशेनं रवाना देखील झाले आहेत. मतदानाला निघण्याआधी राजू पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना महत्वाचं विधान केलं. "मागील निवडणुकीत एकेक मताची किंमत सर्वांना कळाली आहे. आम्ही व्यक्ती बघूनच मागच्यावेळी मतदान केलं होतं. तशी विनंती राज ठाकरे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांच्या आदेशानुसारच मी मतदान केलं होतं. काल रात्री मी राज ठाकरेंची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसारच मी मतदान करणार आहे", असं राजू पाटील म्हणाले.
VIDEO: "राज साहेबांशी रात्री बोलणं झालं, त्यांनी सांगितलं..."; मनसेचे आमदार राजू पाटील यांचं विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचं विधान pic.twitter.com/qTwdPZDub2
— Lokmat (@lokmat) June 20, 2022
भाजपासोबतच शिवसेना अन् काँग्रेसकडूनही विचारणा
राज्यसभा निवडणुकीवेळी भाजपाकडून मनसेच्या मताला साद घालण्यात आली होती. पण यावेळी भाजपासोबतच शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांनीही गळ घातल्याची माहिती खुद्द राजू पाटील यांनी यावेळी दिली. "मागच्या वेळी फक्त भाजपाकडून विचारणा झाली होती. यंदा मात्र शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांकडूनही विचारणा झाली होती. छोट्या पक्षांचं किती महत्व आहे हे या निवडणुकीनं दाखवून दिलं आहे. मी ज्या उमेदवाराला मत देणार तो निवडून येणारच", असं राजू पाटील म्हणाले.