शरद पवारांच्या निवृत्तीमुळे मविआची वज्रमूठ सैल? पुढील तिन्ही सभा रद्द; चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 03:39 PM2023-05-03T15:39:53+5:302023-05-03T15:41:05+5:30
maha vikas aghadi vajramuth sabha: शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर मविआच्या तीन वज्रमूठ सभा रद्द झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे.
Sharad Pawar: ०१ मे रोजी महाराष्ट्र दिनी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा मुंबईत पार पडली. ही महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा होती. यापूर्वी छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे वज्रमूठ सभेचे आयोजन करण्यात आले होते. यापुढेही राज्यभरात वज्रमूठ सभांचे आयोजन केले जाणार होते. मात्र, महाविकास आघाडीच्या पुढील तीन वज्रमूठ सभा रद्द झाल्याची माहिती देण्यात आली आहे. शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होत निवृत्तीची घोषणा केल्यानंतर यासंदर्भातील माहिती समोर आल्यामुळे चर्चांना उधाण आले असून, शरद पवार यांच्या निवृत्तीमुळे वज्रमूठ सैल झाली का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर, नाशिक आणि पुणे येथे होणारी वज्रमूठ सभा रद्द करण्यात आली आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांच्या या निर्णयाचा परिणाम आता मविआच्या वज्रमूठ सभेवर होताना दिसत असल्याचे बोलले जात आहे.
सभा रद्द करण्याच्या निर्णयावर आधीच चर्चा झाली होती
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना वज्रमूठ सभा रद्द होण्याच्या माहितीबाबत प्रश्न विचारण्यात आले. माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, उन्हामुळे सभेच्या तारखा बदलण्यात आल्या आहे. सभा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासंदर्भात ही चर्चा १ तारखेलाच अनौपचारिक चर्चा झाली होती, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. मात्र, संभाजीनगर, नागपूर आणि मुंबईतील वज्रमूठ सभा सायंकाळी आयोजित करण्यात आल्याने जयंत पाटील यांनी दिलेल्या माहितीत कितपत तथ्य आहे, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडी उभी करण्याचे श्रेय सर्वच नेते शरद पवार यांना देतात. मात्र पवार यांनी निवृत्ती जाहीर केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पवार यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीचे काय होणार, हा मोठा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. शिवसेना ठाकरे गट तसेच काँग्रेसकडून महाविकास आघाडीवर कोणता परिणाम होणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"