Maharashtra Politics: मविआचा करेक्ट कार्यक्रम! ठाकरे गट, काँग्रेसला खिंडार; ६ माजी नगरसेवक शिंदे गटात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 09:33 PM2023-02-15T21:33:28+5:302023-02-15T21:33:36+5:30
Maharashtra News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीतील माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला.
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यापासून ठाकरे गटाला दिवसेंदिवस भगदाड पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या युतीला चांगले यश आल्याचे दिसून आले. केवळ ठाकरे गट नाही, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील नेते, पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत. यातच रत्नागिरीत महाविकास आघाडीला खिंडार पडल्याचे सांगितले जात आहे.
कोकणात महाविकास आघाडीला खिंडार पडले असून, बाळासाहेबांची शिवसेना व भाजप युती यांच्याकडून महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा रणनीती आखण्यात आल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस पक्षाला खिंडार पडले आहे. काँग्रेसचे चार व शिवसेना ठाकरे गटाच्या दोन महिला माजी नगरसेविका अशा एकूण सहा माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
प्रशांत यादव यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा
आमदार योगेश कदम व त्यांचे समर्थक उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते नासिर खोत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी चिपळूण येथील नगरसेवकांचा पक्षप्रवेश झाला. त्यापाठोपाठ चिपळूण काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. राजीनामा दिलेले चिपळूण काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते नॉट रिचेबल असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, नगरसेवकांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे स्वागत करतानाच माझ्यावर जो विश्वास दाखवलात तो सार्थ ठरवू, चिपळूणच्या विकासाला गती देऊ, अशी ग्वाही दिली. तसेच दुसरीकडे, प्रशांत यादव हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"