Vidhan Parishad Election: गाडी घसरल्याने मविआचे मंत्री शंकरराव गडाख यांच्या मणक्याला दुखापत; मतदानानंतर रुग्णालय गाठले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 03:36 PM2022-06-20T15:36:06+5:302022-06-20T15:36:41+5:30
Vidhan Parishad Election 2022 : महाविकास आघाडीचे मंत्री शंकरराव गडाख सकाळीच विधान भवनात दाखल झाले. मात्र, त्यांना चालता येत नव्हते.
विधान परिषद निवडणुकीला परदेशात गेलेले आमदारही रातोरात मुंबईत दाखल झाले आहेत. अशावेळी राज्यभरात असलेले आमदार मुंबईकडे येण्यासाठी निघाले होते. काही पक्षांचे आमदार, अपक्ष आमदार मुंबईत दाखल झाले होते. भाजपाने तर आजारी असलेल्या आमदारांनाही पुण्याहून मुंबईत बोलावले होते. अशातच मविआचे मंत्री शंकरराव गडाख हे देखील मतदान करून थेट रुग्णालयात भरती झाले आहेत.
महाविकास आघाडीचे मंत्री शंकरराव गडाख सकाळीच विधान भवनात दाखल झाले. मात्र, त्यांना चालता येत नव्हते. यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना आधार दिला होता. विधानपरिषदेच्या मतदानासाठी मुंबईच्या दिशेने येत असताना गडाख यांची गाडी घसरली. यामुळे त्यांच्या मणक्याला दुखापत झाली होती. गडाख यांना कंबरेमध्ये तीव्र वेदना जाणवत होत्या.
गडाख सहकाऱ्यांच्या खांद्यावर हात टाकून पाऊले टाकत होते. त्यांना वेदना होत होत्या. कसेबसे ते मतदान करून बाहेर पडले आणि रिलायन्सचे रुग्णालय गाठले.
भाजपाने पुण्याचे व पिंपरी चिंचवड भागातील आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना मतदानासाठी आणले होते. मुक्ता टिळक या कारमधून तर जगताप हे अँम्बुलन्समधून मतदान करण्यासाठी आले होते.