उल्हासनगरात महायुतीचे जमले?
By admin | Published: January 19, 2017 03:48 AM2017-01-19T03:48:56+5:302017-01-19T03:48:56+5:30
शिवसेना-भाजपा युतीच्या वाटाघाटी बहुतांशी यशस्वी झाल्याची माहिती भाजपा शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी ‘लोकमत’ला दिली.
सदानंद नाईक,
उल्हासनगर- महापालिका निवडणुकीतील शिवसेना-भाजपा युतीच्या वाटाघाटी बहुतांशी यशस्वी झाल्याची माहिती भाजपा शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी ‘लोकमत’ला दिली. शिवसेना-भाजपाने आपल्या वाट्याच्या प्रत्येकी पाच जागांवर पाणी सोडत त्या साई पक्षाला देऊन सिंधी मतांचे विभाजन टाळण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. आता नव्या संभाव्य जागावाटपानुसार शिवसेना २८, भाजपा २८, साई पक्ष १० व रिपाइं १२ जागा लढणार असल्याचे आयलानी यांनी सांगितले. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनीही ९० टक्के युती पक्की असल्याचे सांगितले.
उल्हासनगरात ओमी कलानी टीमला भाजपात प्रवेश देण्यास आयलानी यांचा विरोध आहे, तर भाजपाने कलानी यांना प्रवेश दिला किंवा त्यांच्यासोबत हातमिळवणी केली तर पंचाईत होईल, हे शिवसेनेला ठाऊक असल्याने स्थानिक नेत्यांनी वाटाघाटी करून पुन्हा शिवसेना,भाजपा, साई व रिपाइं यांची मोट बांधली आहे. बुधवारी दुपारी शिवसेना-भाजपा युतीबाबतची चर्चा पार पडली असून दोन दिवसांत अंतिम निर्णय घोषित करणार असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख चौधरी व भाजपा शहर जिल्हाध्यक्ष आयलानी यांनी दिली. शिवसेनेने बैठकीत सुरुवातीला जुन्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेना-भाजपा प्रत्येकी ३३ आणि रिपाइं १२ जागा अशी मागणी केल्याने वादंग निर्माण झाला होता. सिंधी मतांची विभागणी होऊ नये, म्हणून शिवसेना-भाजपा व रिपाइंच्या महायुतीत साई पक्षाला घेण्याचा निर्णय घेतला. भाजपा ३८ पैकी २८ जागा लढेल व १० जागा साई पक्षाला दिल्या जातील, असे समजते.
भाजपाकडून आयलानी, ज्येष्ठ नेते नरेंद्र राजानी, जमनुदास पुरस्वानी, राजा गेमनानी, राम चार्ली तर शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख चौधरी, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना उपशहरप्रमुख दिलीप गायकवाड, धनंजय बोडारे उपस्थित होते.
भाजपात फुटीची शक्यता : भाजपातील ज्या गटाने कलानी यांना पक्षात आणण्यासाठी प्रदेशाध्यक्षांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत उंबरठे झिजवले, ते महायुतीचे जागावाटप अंतिम झाल्यास पक्षाला सोडचिठ्ठी देऊन कलानी यांच्या छत्रछायेखाली जाण्याची शक्यता आहे. त्यांचे प्रभाग कलानी यांचे वर्चस्व असलेल्या परिसरात येत असल्याने त्यांना कलानी यांनी भाजपात यावे, असे वाटत होते. मात्र, त्या प्रयत्नांना अपयश आल्याने त्यांच्यापुढे पक्षांतराखेरीज पर्याय राहणार नाही, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
>कलानींच्या धास्तीनेच महायुती : ओमी कलानी यांनी गेल्या सहा महिन्यांपासून प्रचार सुरू केला आहे. तसेच गोव्यातील पक्ष कार्यकर्ता शिबिरात ४८ उमेदवारांची यादी घोषित करून प्रचाराला सुरुवात केली. गेल्या आठवड्यात ३५ ते ४० उमेदवारांच्या निवडणूक प्रचार कार्यालयांचे उद्घाटन केले आहे. एकीकडे हे सुरू असतानाच दुसरीकडे भाजपासोबत जाण्याचे ओमी यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला खीळ घालण्याकरिता महायुतीचे जागावाटप केल्याचे बोलले जाते.