उल्हासनगरात महायुती अशक्य

By admin | Published: January 17, 2017 04:29 AM2017-01-17T04:29:33+5:302017-01-17T04:29:33+5:30

रिपाइंशी परस्पर जागावाटप केल्याने शिवसेनेचे नेते प्रचंड नाराज झाले आहेत.

Maha Yute impossible in Ulhasnagar | उल्हासनगरात महायुती अशक्य

उल्हासनगरात महायुती अशक्य

Next


उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेत भाजपाचाच महापौर असेल, अशी घोषणा करून रिपाइंशी परस्पर जागावाटप केल्याने शिवसेनेचे नेते प्रचंड नाराज झाले आहेत. यामुळे शिवसेना, भाजपा, रिपाइं आणि साई पक्षातील जागावाटपात घोळ झाला असून आता महायुती अशक्य असल्याचे शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी स्पष्ट केले. भाजपाच्या नेत्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला, तर साई पक्षाने महायुती गरजेची असल्याचे मत मांडले.
सध्या महायुतीतील जागावाटपाची चर्चा पूर्णत: थांबली आहे, याकडेही चौधरी यांनी लक्ष वेधले. उल्हासनगर महापालिकेवर गेले दशकभर शिवसेना, भाजप, साई, रिपाइं, अपक्षांची सत्ता आहे. २००७ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाली होती आणि प्रत्येकी ३५ व ४० जागांचे वाटप झाले होते. त्यावेळी शिवसेनेचे १६ तर भाजपाचे ११ नगरसेवक निवडून आले. पालिकेवरील सत्तेसाठी स्थानिक पातळीवरील तेव्हाच्या लोकभारती आणि आताच्या साई पक्षासोबत महायुती करून सत्ता काबीज करण्यात आली. त्यावेळी साई पक्षाचे १४ नगरसेवक निवडून आल्याने सत्तेची सूत्रे त्यांच्याकडे गेली होती. त्यांना पहिल्या सव्वा वर्षाचे महापौरपद देण्यात आले.
२०१७ च्या निवडणुकीत पुन्हा भाजप-शिवसेना व रिपाइंची महायुती होवून सेना व भाजपने प्रत्येकी ३३ जागांवर तर रिपाइंनी १२ जागांवर निवडणूक लढवली. शिवसेनेचे-२०, भाजपचे-११ तर रिपाइंचे चार नगरसेवक निवडून आले.
शिवसेनेने दोन्ही वेळी भाजपापेक्षा कमी जागा लढविल्या. मात्र त्यांचे जादा नगरसेवक निवडून आले. तसेच विजय पाटील, राजेश वानखडे, सुनील सुर्वे यांच्या रूपाने शिवसेनेचे तीन बंडखोर नगरसेवक निवडून आले. पुन्हा सत्तेची चावी आठ नगरसेवक निवडून आलेल्या साई पक्षाकडे गेली. भाजप-शिवसेनेने पुन्हा साई पक्षासोबत महायुती करून पालिकेत सत्ता मिळविली. मात्र महापौरपद साई पक्षाला दिले. आता तर ओमी टीमच्या प्रवेशाच्या चर्चेने व मोदी लाटेने भाजपा फुगल्याची टीका महायुतीच्या अन्य पक्षांत सुरू आहे. त्यामुळेच भाजपाने मित्रपक्ष शिवसेनेला डावलून रिपाइंसोबत परस्पर युती केली आणि १४ जागा त्यांना देऊन टाकल्या.
भाजपाच्या भूमिकेने शिवसेनेत नाराजी पसरली असून महायुती अशक्य असल्याचे शिवसेना नेते आणि शिवसैनिक उघडपणे सांगू लागले आहेत. भाजपाच्या याच भूमिकेमुळे गेल्या १५ दिवसांपासून शिवसेना-भाजपा युतीची बोलणी पूर्णपणे थांबल्याची प्रतिक्रिया राजेंद्र चौधरी यांनी दिली. कलानी कुटुंबाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महायुतीची गरज असल्याचे मत साई पक्षाचे जीवन इदनानी यांनी व्यक्त केले. महायुतीची बोलणी नव्याने होऊ शकतात, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. (प्रतिनिधी)
>जागा सोडण्यावर घोळ
शिवसेना, भाजपा, रिपाइं व साई पक्षाची महायुती झाल्यास साई पक्षाचा ज्या परिसरात प्रभाव आहे. तेथील जागा दोन्ही पक्षांनी सोडाव्या, असी आमची मागणी असल्याचा पुनरूच्चार साई पक्षाचे जीवन ईदनानी यांनी केला. मात्र या जागा कोणी सोडायच्या, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यामुळे जागावाटपात घोळ होणार आहे. त्यामुळे साई पक्षाला सोबत घेऊन युती करणे अवघड असल्याचे शिवसेना, भाजपाच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
>आयलानी यांचे मौन : भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी महायुतीबाबत काहीही भाष्य करण्यास नकार दिला. पक्षाच्या निर्णयानंतरच युतीबाबत चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Maha Yute impossible in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.