महाबिजच्या भेसळयुक्त बियाण्यांची कृषी विभागाकडून दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2017 06:19 PM2017-08-01T18:19:05+5:302017-08-01T18:21:48+5:30
नाना देवळे वाशिम, दि. 1 - महाबिजकडून विक्री करण्यात येत असलेले बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारी असतांनाच महाबिजचे बियाणे भेसळयुक्त ...
नाना देवळे
वाशिम, दि. 1 - महाबिजकडून विक्री करण्यात येत असलेले बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारी असतांनाच महाबिजचे बियाणे भेसळयुक्त असल्याचा प्रकार मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथे आढळून आला होता. याप्रकरणी लोकमतने २५ जुलैच्या अंकात ‘पेरले एक उगवले दुसरेच’ या मथळ्या खाली वृत्त प्रकाशीत करुन कृषी विभागाचे लक्ष वेधले होते. याची दखल कृषी विभागाने घेत १ ऑगस्ट रोजी संबंधित शेतकऱ्यांच्या शेताला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांने मागितलेले बियाणे तर इतर बियाणे ७० टक्के असल्याचे त्यांना आढळून आले.
मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथील गोविंदा मोतीराम भगत या शेतकºयाने यंदाच्या हंगामात पेरणीसाठी खरेदी विक्री समितीमधून ८ जुन २०१७ रोजी अनुदानाचे तीन बॅग सोयाबीन बियाणे विकत घेतले. त्यांनी महाबिजच्या ९३०५ या वाणाची पेरणी केली.काही दिवसांनी बियाणे चांगले उगवले.परंतु सुरुवातीला रोपे लहान असतांना त्यांना त्यामध्ये मिश्र वाण असल्याचे दिसले नाही. पंरतु रोपे मोठी झाल्यानंतर काही रोपांची पाने लांबट असल्याचे दिसून आले तर काही पाने गोलसर असल्याचे दिसून आले.त्यावरुन बारकईने निरीक्षण केले असता त्यांनी घेतलेल्या ९३०५ या सोयाबीन बियाण्यासह दुसऱ्या वाणाचेही रोपे असल्याचे आढळून आले. महाबिजचे ९३०५ हे सोयाबीन बियाणे इतर सोयाबीन वाणापेक्षा अगोदर येणारे आहे. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांची समस्या उजागर करण्यासाठी लोकमतने २५ जुलै रोजी वृत्त प्रकाशित करुन कृषी विभागाचे लक्ष वेधले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे होणारे मोठे आर्थिक नुकसान तसेच शेतकऱ्याने याबाबत केलेल्या तक्रारीचा उल्लेखही करण्यात आला होता. सदर तक्रारीची दखल कृषी विभागाने घेतली आणि मंगळवार १ ऑगस्ट रोजी शेतकरी गोविंदा मोतीराम भगत यांच्या चांभई येथील शेतास भेट देऊन उगविलेल्या सोयाबीन बियाण्याची पाहणी केली. यावेळी कृषी शास्त्रज्ञ भरत गिते, तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे, पंचायत समिती कृषी अधिकारी प्रल्हाद शेळके, महाबिज सहाय्यक क्षेत्र अधिकारी एस.बी.नवगण, कृषी सहाय्यक निरंजन महल्ले उपस्थित होते. या चमूने केलेल्या पाहणीत सोयाबीनच्या पिकात शेतकºयाने मागितलेल्या ९३०५ या वाणाचे प्रमाण केवळ ३० टक्के तर इतर वाण ७० टक्के वाण असल्याचे त्यांना आढळुन आले.यामध्ये ९३०५ हे लवकर येणारे व अधिक उत्पन्न देणारे असून सध्यास्थितीत या वाणाच्या झाडांना शेंगा लागण्यास सुरुवात झाली आहे. येत्या महिन्याभरात ९३०५ वाण काढणीवर येईल तर इतर वाणाची झाडे हिरवी राहतील यामध्ये सोंगणी करतांना पंचायत होणार आहे. त्यामुळे सदर शेतकऱ्याने १ लाख रुपये देण्याची मागणी केली आहे.