महाबळेश्वरमध्ये तापमान शून्य अंशावर, लिंगमळा परिसरात दवबिंदूंचे बर्फात रूपांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 10:26 PM2022-01-12T22:26:49+5:302022-01-12T22:50:26+5:30
Winter in Mahabaleshwar : महाबळेश्वर पर्यटनस्थळी थंडीचा कडाका वाढला असून येथील नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक जेटीसह लिंगमळा परिसरात दवबिंदूचे हिमकणात रूपांतर झाल्याचे दृश्य बुधवारी पहाटे पाहावयास मिळाले.
महाबळेश्वर - महाबळेश्वर पर्यटनस्थळी थंडीचा कडाका वाढला असून येथील नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक जेटीसह लिंगमळा परिसरात दवबिंदूचे हिमकणात रूपांतर झाल्याचे दृश्य बुधवारी पहाटे पाहावयास मिळाले. वेण्णालेक परिसरात मंगळवारी रात्री ० अंश तापमानाचीही नोंद झाली तर बुधवारी पहाटे २ ते ३ अंश तापमान असल्याची माहिती मिळाली आहे. महाबळेश्वर शहर व परिसरात गेल्या चार पाच दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी रात्री थंडीत वाढ होऊन बुधवारी पहाटे वेण्णा लेक परिसरात तापमानाचा पारा उतरल्यामुळे दवबिंदू गोठून हिमकण तयार झाले होते.
महाबळेश्वर शहर व परिसरात थंडीचा जोर वाढला असून या कडाक्याच्या थंडीमुळे निसर्गाची विविध आकर्षक रूपे व सृष्टीसौंदर्य पाहावयास मिळत आहे. वेण्णालेक परिसर, लिंगमळा परिसरामध्ये थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे. बुधवारी पहाटे वेण्णालेक परिसर धुक्याच्या दुलईत न्हाऊन निघाला होता. या परिसरामध्ये थंडीचे प्रमाण अधिक असल्याने स्थानिकांनी शेकोटीचा आधार घेतल्याचे पाहावयास मिळाले. येथील प्रसिद्ध वेण्णालेकसह लिंगमळा परिसरामध्ये चारचाकी गाड्यांच्या टपांवर, पानांवर, वेण्णालेकच्या लोखंडी जेटीवर काही प्रमाणात दवबिंदू गोठून हिमकण जमा झाल्याचे दिसले. तर लिंगमळानजीक स्मृतीवन परिसरात तर झाडाझुडपांवर, पानांवर हिमकण जमा झाले होते.
हंगामात पहिल्यांदाच दिसले हिमकण
महाबळेश्वर परिसरात थंडीचे प्रमाण वेण्णालेक पेक्षा अधिक जाणवत होते. या थंडीच्या हंगामातील हिमकण दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. थंडी अशीच कायम राहिली तर पुन्हा हिमकण पाहण्याचा अनुभव पर्यटकांना मिळेल. दिवसभरात ० ते ४ अंशापर्यंत तापमान होते.