देशातील पहिला हनी पार्क होणार महाबळेश्वरला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 08:54 PM2017-12-08T20:54:47+5:302017-12-08T20:55:58+5:30
मधाची निर्मिती, संशोधन व अभ्यास तसेच ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी देशातील पहिला हनी पार्क निर्मिती महाबळेश्वरला उभारण्यात येणार असून, याबाबत प्रस्ताव उद्योग विभागाकडे मंजुरीसाठी सादर केला आहे, अशी माहिती महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती विशाल चोरडिया यांनी दिली.
अमरावती : मधाची निर्मिती, संशोधन व अभ्यास तसेच ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी देशातील पहिला हनी पार्क निर्मिती महाबळेश्वरला उभारण्यात येणार असून, याबाबत प्रस्ताव उद्योग विभागाकडे मंजुरीसाठी सादर केला आहे, अशी माहिती महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती विशाल चोरडिया यांनी दिली. महाखादी यात्रेनिमित्त अमरावती आलेले ना. चोरडिया येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते.
हनी पार्कमध्ये मध निर्मिती व मधुमक्षिका संगोपनाचे धडे देण्यात येणार आहेत. मध उद्योगासंबंधी इत्थंभूत माहिती येथे देण्यात येणार आहे. १० कोटींहून अधिक रकमेचा हा प्रकल्प असून, त्याचे डिझाइन एका कंपनीला देण्यात आले आहे. अधिकृत प्रक्रियेनंतर प्रकल्पाची किंमत जाहीर करण्यात येईल. राज्यात सध्या मधपेट्यांची संख्या २५ हजारांच्या आसपास आहे. हनी पार्क उभारल्यानंतर त्यांची संख्या दोन लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट राहणार आहे. खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून उद्योजकीय घटकांना चालना देण्याचे काम आम्ही करीत आहोत, असे ते म्हणाले. यावेळी जिल्हा खादी व ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे उपस्थित होते.