‘राम मंदिर’ स्थानकावरून सेना-भाजपात ‘महाभारत’

By Admin | Published: December 23, 2016 05:39 AM2016-12-23T05:39:01+5:302016-12-23T05:39:01+5:30

पश्चिम रेल्वेमार्गावर उभारण्यात आलेल्या ‘राम मंदिर’ रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनावरून शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये चांगलेच महाभारत

'Mahabharat' in army and BJP from 'Ram temple' station | ‘राम मंदिर’ स्थानकावरून सेना-भाजपात ‘महाभारत’

‘राम मंदिर’ स्थानकावरून सेना-भाजपात ‘महाभारत’

googlenewsNext

मुंबई : पश्चिम रेल्वेमार्गावर उभारण्यात आलेल्या ‘राम मंदिर’ रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनावरून शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये चांगलेच महाभारत घडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामापेक्षा मोठे नाहीत, असे विधान परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केल्याने भाजपा कार्यकर्ते संतप्त झाले. तर शिवसैनिकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंना आपले भाषण आवरते घ्यावे लागले.
पश्चिम रेल्वेमार्गावरील जोगेश्वरी ते गोरेगावदरम्यान बांधण्यात आलेल्या ‘राम मंदिर’ स्टेशन उद्घाटनाचा कार्यक्रम गुरुवारी पार पडला. कार्यक्रमाला शिवसेना, भाजपासह बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती. झेंडे, होर्डिंग्ज, बॅनर यामुळे रेल्वे स्थानक आणि परिसरातील वातावरण राजकीय होऊन गेले. काही कार्यकर्ते तर मान्यवरांसाठी असलेल्या मंचासमोर ठाण मांडून होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ‘जय श्रीराम’सह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावांनी झालेल्या घोषणाबाजीने सभास्थान दणाणून गेले. सुरुवातीला शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर आणि राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची भाषणे झाली. त्या वेळीही भाजपाकडून ‘जय मोदीं’ची घोषणा देण्यात आली. तर राज्यमंत्री विद्या ठाकूर या भाषणाला येताच शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. तर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या भाषणात भाजपा कार्यकर्त्यांनी अडथळे आणत ‘जय मोदी’च्या घोषणा दिल्या.
बराच वेळ घोषणाबाजी सुरुच असल्याने रावते यांचा संताप अनावर झाला. मंचासमोर येत त्यांनी ‘मोदी हे रामापेक्षा मोठे नाहीत’, असे विधान केले. शिवाय, गोंधळ घालणारे लंकेतून आले असावेत, अशी टिप्पणी केल्यामुळे गोंधळ अधिकच वाढला. या गोंधळातच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना अवघ्या दोन मिनिटांत आपले भाषण आटोपते घ्यावे लागले. त्यानंतर रेल्वेमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींनी काढता पाय घेतला. (प्रतिनिधी)

Web Title: 'Mahabharat' in army and BJP from 'Ram temple' station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.