जिहादवरून 'महाभारत'; शिवराज पाटलांच्या वादग्रस्त विधानावर भाजपाचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 01:04 PM2022-10-21T13:04:14+5:302022-10-21T13:04:35+5:30
शिवराज पाटील यांनी भगवद्गीतेतील श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल्या उपदेशाची तुलना जिहादशी केली हे त्यांच्या कॉंग्रेसी संस्काराशी सुसंगत असेच आहे असं भाजपानं म्हटलं आहे.
नोएडा - माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेस नेते शिवराज पाटील यांनी श्री कृष्णाबाबत केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. गुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीनिमित्त राजकीय मैदानात या वादाला सुरुवात झाली. श्री कृष्णाने अर्जुनला जिहाद शिकवला असं विधान शिवराज पाटील यांनी केले. त्यावर आता स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
शिवराज पाटील पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, तुम्ही कुराण वाचा, त्यात ईश्वराच्या कुठल्याही रुपाची चर्चा नाही. ईश्वर रुपविहिन आहे. गीता आणि बायबलमध्येही हाच प्रकार आहे. मी जे बोललो ते चुकीच्या रितीने समोर आणले गेले असं ते म्हणाले, यावेळी शिवराज पाटील संतापल्याचं दिसून आले. एका पत्रकाराला शिवराज पाटील यांनी विचारलं की, तुम्ही श्रीकृष्णाने अर्जुनाला जो उपदेश दिला त्याला जिहाद म्हणणार का? त्यावर काहीही उत्तर आलं नाही. तेव्हा मीदेखील हेच म्हणत आहे असं त्यांनी सांगितले.
काय म्हणाले होते शिवराज पाटील?
जिहादची व्याख्या केवळ इस्लाम नाही तर भगवत् गीता आणि इसाई धर्मातही आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किदवई यांच्या आत्मचरित्राच्या कार्यक्रमाला शिवराज पाटील म्हणाले की, इस्लाम धर्मात जिहादवर खूप चर्चा झाली. जेव्हा योग्य भूमिका आणि गोष्टी माहिती असूनही काही समजत नाही. तेव्हा ताकदीचा वापर केला जातो. हे केवळ कुराणात नाही. महाभारत, गीतेतही लिहिलं आहे. श्रीकृष्णानेही अर्जुनाला जिहादबाबत म्हटलं असं त्यांनी सांगितले.
भाजपाचा शिवराज पाटील यांना टोला
शिवराज पाटील यांच्या विधानावरून भाजपाने टोला लगावला आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, शिवराज पाटील यांनी भगवद्गीतेतील श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल्या उपदेशाची तुलना जिहादशी केली हे त्यांच्या कॉंग्रेसी संस्काराशी सुसंगत असेच आहे. मुस्लिम तुष्टीकरणासाठी कॉंग्रेस नेहमीच हिंदू धारणांचा अपमान करत असते. यासाठी इतिहासाची मोडतोड केलीच, पण अध्यात्माचीही विकृत मोडतोड करण्याच्या कॉंग्रेसी राजकारणाचा चेहरा शिवराज पाटील यांनी उघड केला. महाभारतातील युद्ध केवळ धर्मांधांचा धुमाकूळ नव्हता किंवा धर्मप्रसाराच्या नावाखाली केलेल्या कत्तली नव्हत्या. दुर्जनांचा नाश करून अधर्माचा धुमाकूळ थांबविण्यासाठी युद्ध करावेच लागेल असे श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले होते. धर्माच्या नावाने कत्तली करणे आणि अधर्म रोखण्यासाठी दुर्जनांचा नाश करणे या संकल्पनांतील फरक पाटील यांना माहित नाही. त्यांनी गीतेचा अभ्यास केला नसावा किंवा धर्मद्वेष पसरविण्याच्या हेतूने त्यांनी हे विखारी विधान केले असावे. लांगुलचालनाच्या राजनीतीपोटी कॉंग्रेस किती रसातळाला जाते याचे पाटील यांचे विचार हे एक उदाहरण आहे असं त्यांनी सांगितले.