‘महाबीज’ला बियाणे फरकाची रक्कम मिळणार!
By admin | Published: July 6, 2016 01:36 AM2016-07-06T01:36:34+5:302016-07-06T01:36:34+5:30
बियाणे विक्रीच्या फरकाची रक्कम ३0 जुलैपर्यंंत शेतक-यांना देण्यात येणार!
अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) यावर्षी वाढीव दराने उपलब्ध केलेल्या बियाणे विक्रीच्या फरकाची रक्कम २८ कोटी रुपये असून, फरकाची ही रक्कम ३0 जुलैपर्यंंत शेतकर्यांना देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. याकरिता १५ जुलैपर्यंंंत शेतकर्यांकडून माहिती गोळा केली जाणार आहे.
मागील पाच-सहा वर्षांंंपासून पावसाच्या अनिश्चिततेचा सामना करणार्या शेतकर्यांना २0१५-१६ मध्ये भीषण दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले. अशावेळी शेतकर्यांना सवलती देण्यात येतात, बियाण्यांवर अनुदान दिले जाते; परंतु ते तर मिळालेच नाही, उलट महाबीजने बियाण्यांचे दर ३५ टक्क्यांवर वाढविल्याने शेतकर्यांवर संकटच कोसळले. त्यामुळे प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी हवालदिल झाला. ही सर्व परिस्थिती बघता या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मूग, उडीद व तूर बियाण्यांचे दर कमी करण्याचा आदेश महाबीजला दिला होता. महाबीजने तातडीने त्यांच्या विक्रेत्यांना पत्र पाठवून बियाणे दर कमी करू न जुन्याच दराप्रमाणे बियाणे विक्री करण्यासंबंधीचे पत्र पाठविले; परंतु तोपर्यंंंत बराच अवधी लोटल्याने जवळपास सर्वच शेतकर्यांनी बियाणे खरेदी केले. त्यामुळे ज्या शेतकर्यांनी वाढीव दराने मूग, उडीद व तुरीचे बियाणे खरेदी केले, त्या शेतकर्यांना जुन्या व नवीन दरातील फरकाची रक्कम देण्यात येणार आहे.
याकरिता १५ जुलैपर्यंंंत शेतकर्यांनी खरेदी केलेले बियाणे गोणी, त्यावरील टॅग, बँक खाते व त्या खात्यांचा आयएसएससी कोड, तालुका, जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय, संबंधित बियाणे विक्रेते व महाबीजकडे उपलब्ध करू न द्यायचे आहेत. शेतकर्यांनी दिलेल्या या कागदपत्रांची छाननी केली जाणार असून, ३0 जुलैपर्यंंंत शेतकर्यांना ही फरकाची रक्कम अदा केली जाणार असल्याचे वृत्त आहे.
आता २८ कोटींची प्रतीक्षा
महाबीजने विक्री केलेल्या बियाण्यांच्या फरकाची रक्कम २८ कोटी रुपये आहे. पण, ही रक्कम अद्याप शासनाकडून प्राप्त झाली नसल्याने महाबीजलाही या रकमेची प्रतीक्षा आहे.