महाड दुर्घटना : वडील अत्यवस्थ असतानाही 'त्यांनी' बजावले कर्तव्य
By Admin | Published: August 9, 2016 11:21 PM2016-08-09T23:21:22+5:302016-08-10T10:51:59+5:30
सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे शोधकार्य राबवणारे महाडचे पोलीस निरीक्षक रवी शिंदे यांच्या कर्तव्य तत्परतेनं आली
जयंत धुळप/ऑनलाइन लोकमत
अलिबाग, दि. 9 - छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या देदीप्यमान इतिहासात नरवीर तानाजी मालुसरे यांची कर्तव्याप्रति निष्ठा सांगणारे 'आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे..' त्यागाचे विधान सर्वश्रुत आहे. त्याचीच प्रचिती महाडजवळच्या सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे शोधकार्य राबवणारे महाडचे पोलीस निरीक्षक रवी शिंदे यांच्या कर्तव्य तत्परतेनं आली. शिंदेंच्या वडिलांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयातल्या आयसीयूमध्ये दाखल केलं. त्यावेळी जीवनाच्या शेवटचे क्षण मोजणा-या त्यांच्या वडिलांनी रवी शिंदे यांना भेटीसाठी सांगावा पाठवला. मात्र कर्तव्यनिष्ठ असणा-या रवींद्र शिंदे शोधकार्यात स्वतःला झोकून दिलं असल्यानं त्यांनी रुग्णालयात जाऊन वडिलांची भेटही घेतली नाही आणि त्यातच वडिलांचं निधन झालं.
सावित्री पूल दुर्घटनेतील मृतांचा शोध घेण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली. एनडीआरएफच्या जवानांनासोबत रवींद्र शिंदे जातीनं लक्ष घालून हे शोधकार्य राबवत होते. मात्र अचानक त्याच वेळी म्हणजेच बुधवारी 3 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कल्याण येथून शिंदेच्या पत्नींचा त्यांना फोन आला, बाबांना बरं वाटतं नाही आहे. त्यांची तब्येत खालावली आहे. तुम्ही ताबडतोब आहे त्या परिस्थितीत कल्याणला निघून या. त्याच वेळी त्यांनी पत्नीला फोनवरूनच मला येण्यास जमणार नाही. तू बाबांना तात्काळ रुग्णालयात दाखल कर, असं सांगितलं.काही दिवसांनी बाबांची प्रकृतीत सुधारणा झाली. त्यावेळी बाबांनी स्वतः फोन करून रवींद्र शिंदे यांना भेटून जाण्यास सांगितलं. मात्र कशी बशी रवींद्र शिंदेंनी बाबांची फोनवरूनच समजूत काढली. तुम्ही काळजी करू नका, डॉक्टरांनी तुमची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे. मी हे शोधकार्य संपल्यावर तुमच्या भेटीसाठी येईन, असं सांगून त्यावेळी त्यांनी वेळ मारून नेली. सतत तीन दिवस बाबा फोन करून रवींद्र यांना भेटीसाठी बोलावत होते. तरीसुद्धा बाबांच्या विनवणीकडे दुर्लक्ष करत कर्तव्यनिष्ठ असलेल्या रवींद्र शिंदेंनी अव्याहतपणे शोधकार्य सुरूच ठेवले. अखेर जे घडायला नको होतं तेच घडलं. रविवार 7 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास रवि शिंदे यांच्या पत्नीचा फोन आला अन् तिनं जडअंतकरणानं बाबा गेल्याची दुःखद बातमी दिली.
आता तरी तुम्ही या, या पत्नीच्या विधानानं शिंदे यांच्या पाया खालची जमीनच सरकली. त्यावेळी शिंदे काही काळ अस्वस्थ झाले. पण पुन्हा स्वत:ला सावरत त्यांनी पत्नीला फोन केला नि सांगितले. बाबांची शेवटची इच्छा कोणती होती. तेव्हा पत्नीनं त्यांना बाबांनी मृत्यूनंतर माझा अंत्यविधी आपले मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील हिंगोणा गावांतील आपल्या शेतात करा, असं सांगितलं. त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता रवी यांनी पत्नीला तुम्ही बाबांचे पार्थिव घेऊन आपल्या गावी निघा, मी वरिष्ठांची परवानगी घेऊन येथून थेट जळगावला पोहोचतो. हा सर्व वृत्तांत रवी शिंदे यांनी वरिष्ठ अधिकारी असणा-या महाड उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनवणे यांना सांगितला आणि त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक संजय पाटील आणि पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या कानावर ही घटना तात्काळ घातली.
रवी शिंदेंच्या या कर्तव्य तत्परतेच्या भावनेने सा-यांच्याच डोळे भरपावसात पाणावले. वडिलांच्या इच्छेनुसार शेतात अंत्यसंस्कार झाले. वडिलांना शेवटच्या क्षणी भेटू शकलो नाही. त्यांची अखेरची इच्छा मी पूर्ण करू शकलो नाही. याबद्दल नेहमीच मनात खंत राहील. मात्र माझी जिथं खरी गरज होती तिथं मी काम करत राहिलो, यातच मला समाधान आहे, अशी भावना महाडचे पोलीस निरीक्षक रवी शिंदे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. वडिलांचे कार्य आटोपून 20 ऑगस्ट रोजी पुन्हा कामावर रुजू होणार असल्याचंही त्यांनी सांगिलतं. त्यांच्या कामाप्रती असलेल्या श्रद्धेला लोकमतचा सलाम.