महाडमध्ये आगीत चार दुकाने भस्मसात
By Admin | Published: May 19, 2016 03:18 AM2016-05-19T03:18:52+5:302016-05-19T03:18:52+5:30
बुधवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये चारही दुकाने पूर्णपणे भस्मसात झाली.
महाड : शहरातील बाजारपेठेत जिजामाता भाजी मार्केट इमारतीच्या लगत असलेल्या चार दुकानांना बुधवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये चारही दुकाने पूर्णपणे भस्मसात झाली. आगीत सुमारे आठ लाखांची हानी झाली असून, सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. महाड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाकडून ही आग आटोक्यात आणली गेली.
भाजी मार्केट इमारतीला लागूनच असलेली ही चारही दुकाने लाकडी पत्रा शेडची होती. अचानक लागलेली ही आग दुकानातील लाकडी सामान, प्लास्टिक छप्पर तसेच दुकानातील प्लास्टिक, रबरी सामानामुळे अधिक भडकली. काही क्षणांतच ही चारही दुकानामध्ये आगीचा भडका उडून ही दुकाने पूर्णपणे भस्मसात झाली. महाड नगर परिषदेची अग्निशामक घटनास्थळी त्वरित दाखल झाला. मात्र त्यापूर्वीच दुकानातील सर्व सामान जळून खाक झाले होते. नगर परिषदेच्या अग्निशामक कर्मचाऱ्यांनी ही आग नियंत्रणात आणली अन्यथा इमारतीमधील सर्व दुकान गाळ्यांना आगीची झळ पोहोचली असती.
आगीत नारायण शिंदे यांचे पाच लाखांचे सर्वाधिक नुकसान झाले असून सुनंदा जाधव, प्रकाश दाभोळकर, विलास शिंदे या गाळेधारकांचेही नुकसान झाले. नगराध्यक्ष महमद अली पल्लवकर, माजी आमदार माणिक जगताप, न. प. मुख्याधिकारी मच्छींद्र घोलप, नगर अभियंता शशिकांत दिघे, विरोधी पक्षनेते बिपीन म्हामूणकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. महसूल विभागामार्फ त करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार या आगीत सुमारे आठ लाख रुपयांची हानी झाल्याची माहिती तलाठी सोनावणे यांनी दिली. (वार्ताहर)