महाड पूल दुर्घटना - सलग चौथ्या दिवशी शोधकार्य सुरु
By Admin | Published: August 6, 2016 08:20 AM2016-08-06T08:20:33+5:302016-08-06T11:44:33+5:30
सावित्री नदीतील शोधकार्याला सलग चौथ्या दिवशी सुरुवात झाली असून आतापर्यत सावित्री नदीत 24 मृतदेह सापडले आहेत.
ऑनलाइन लोकमत
पोलादपूर, दि. 6 - सावित्री नदीतील शोधकार्याला सलग चौथ्या दिवशी सुरुवात झाली आहे. शनिवारी शोधकार्य सुरु केलं असता दोन मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा 24 वर पोहोचला आहे. गुरुवारी म्हणजेच दुर्घटनेच्या दुस-या दिवशी एकूण १४ मृतदेह हाती लागले होते. तर शुक्रवारी 8 मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळालं होतं. मृतांचा आकडा 22 वर पोहोचला असून आज तो वाढण्याची शक्यता आहे. कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे आजही शोधकार्यात अडथळे येऊ आहेत.
शनिवारी सकाळी शोधकार्य सुरु केल्यावर म्हाप्रळच्या खाडीत मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह तवेरा गाडीतून प्रवास करणाऱ्या दिनेश कांबळी यांचा असल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत एकूण 24 मृतदेह आतापर्यंत सापडले आहेत.
एका कारचे अवशेषही शुक्रवारी नौदल आणि एनडीआरएफच्या हाती लागले होते. गाडीचे अवशेष तवेरा कारचे असल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या कारसोबत एक चटई आणि इतर सामानही हाती लागलं आहे.
गुरुवारी महाड पट्ट्यात आणि समुद्र किना-यांवर दुर्घटनाग्रस्तांचे मृतदेह सापडले होते. तर शुक्रवारी केंबुर्ली, वावे, गोरेगाव, दादली खाडीपर्यंत वाहून गेलेले मृतदेह सापडले. नदीच्या जोरदार प्रवाहामुळे इतर बेपत्ता व्यक्ती कदाचित समुद्रापर्यंत वाहत गेल्या असाव्यात, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
महाड-पोलादपूरला जोडणा-या या पुलाच्या दुरावस्थेकडे लोकमतने तीनवर्षापूर्वीच लक्ष वेधले होते. नडगाव-राजेवाडी दरम्यानचा हा ब्रिटीशकालीन पूल अखेरची घटका मोजत असून, हा पूल धोकादायक बनला आहे असे वृत्त लोकमतने ३ सप्टेंबर २०१३ च्या हॅलो रायगड पुरवणीत दिले होते.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे वृत्त लोकमतने दिले होते. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ वरील या पुलाची मुदत संपल्याचे ब्रिटीश एजन्सीने संबंधित यंत्रणेला सूचित केल्याच्या वृत्ताला त्यावेळी संबंधिक अधिका-यांनी दुजोरा दिला होता. पुलाच्या दगडी बांधकामामध्ये पिंपळाच्या झाडाचे साम्राज्य पसरले होते.