तरी ‘भोळा महादेव’ म्हन्तो। राहीन ‘देवेंद्रा’च्या साथीला॥
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 02:18 PM2019-10-12T14:18:20+5:302019-10-12T14:22:40+5:30
भाजपने धोका दिला असं म्हणत महादेव जानकरांनी भाजपवर जोरदार टीकास्र सोडले.. काय व्यथा आहे जानकरांची... ऐका तुम्हीच..
इठ्ठल-बिरुदेवाचं चांगभलं।
खेलु ‘महाद’बुवाचं चांगभलं।।
सुंबरान मांडिलं, सुंबरान मांडिलं
सुंबरान मांडलं गं, सुंबरान मांडलं गं।
सह्याद्रीच्या कुशीत। हो सह्याद्रीच्या कुशीत॥
‘देवेंद्र’ व्हता चालला। ‘देवेंद्र’ व्हता चालला॥
त्याला शिखर व्हतं गाठायचं। हो ‘सह्याद्रीचं शिखर’॥
त्या सह्याद्रीच्या कुशीत। हो सह्याद्रीच्या कुशीत॥
रहात व्हता ‘महादेव’ हो। रहात व्हता ‘महादेव’ ॥
आन मंग ‘देवेंद्र’ त्यो। रस्ता लागला धुंडाइला॥
चतुर ‘देवेंद्र’। रस्ता लागला हो धुंडाइला॥
शिखर गाठायाला। रस्ता नव्हता घावत॥
बेरका मंग ‘देवेंद्र’हो। ‘महादेवा’ला बोलतो॥
रस्ता दाव आमाला। म्होरं तवा जायाला॥
हर हर म्हादेवाऽऽ हर हर शंकरा...
आता ऐका! त्या ‘देवेंद्र’ला ‘महादेवा’नं मदत केल्यावर
काय बक्षीस ‘देवेंद्रा’नं ‘महादेवा’ला दिलं, त्याची कथा!
चतुर ‘देवेंद्रा’नं ‘महादेवा’ला। ‘पागोटं-शेला’ हो दिला
‘पागोट्या’नं हुरळला ‘महादेव’। हो हुरळला ‘महादेव’॥
‘देवेंद्र’ला त्यानं भाऊच की मानिला। भाऊच मानिला॥
ऱ्हायला ‘देवेंद्रा’चा सोबती। नव्या सह्याद्रीच्या मोहिमेला॥
‘महादेवा’चे सखेसोबती। भुलवून ‘देवेंद्र’ घेऊन हो गेला॥
नाराज ‘महादेवा’ला मग । ‘देवेंद्र’ बोलावे हो चहाला॥
देवून रिकाम्या ‘कप-बशी’ला। ‘महादेवा’ला फशिवला॥
‘चहावाल्या’च्या मान्सानं हो। पुर्तं गंडिवलं की हो त्याला॥
तरी ‘भोळा महादेव’ म्हन्तो । राहीन ‘देवेंद्रा’च्या साथीला॥
भुलला ‘शेल्या’च्या मोहाला। हो ‘पागोट्या’च्या मोहाला॥
हर हर ‘महादेवाऽऽ’ हर हर ये शंकरा
सुंबरान मांडिलंऽऽ सुंबरान मांडिलं...
- अभय नरहर जोशी -