'गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात कुर्रर्र केलंय, मेलो तरी ताईची साथ सोडणार नाही'-महादेव जानकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 03:50 PM2021-10-15T15:50:11+5:302021-10-15T15:56:49+5:30
'नेता विकत घेता येत नाही, बनवता येत नाही ते रक्तातच असावं लागतं.'
बीड: आज भगवानगड येथे दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी पंकजा मुंडे, प्रितम मुंडे, रासपचे अध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी महादेव जानकर यांनी आपल्या भाषणातून तुफान फटकेबाजी केली. 'गोपीनाथ मुंडेंनी वंचितांची मोट बांधली, आता तुम्ही पंकजा मुंडेच्या पाठी खंबीर राहा. माझ्या कानात गोपीनाथ मुंडेंनी कुर्रर्र केलंय, मेलो तरी ताईची साथ सोडणार नाही', असं जानकर म्हणाले.
मेलो तरी ताईची साथ सोडणार नाही...
यावेळी जानकर म्हणतात, 'नेता विकत घेता येत नाही, बनवता येत नाही ते रक्तातच असावं लागतं. आरशासमोर भाषण केल्यानं कुणी नेता होत नाही. नेता व्हायला अक्कल लागते. भगवानबाबा एकट्या वंजाऱ्यांचे नव्हते, ते सर्व जाती-धर्माचे होते. भगवान बाबांना जात नव्हती, तशी गोपीनाथ मुंडेंनाही जात नाही. गोपीनात मुंडे यांनी ऊस तोडणाऱ्या माणसाच्या हातात कोयता देण्याऐवजी त्याला आयपीएस, पीएसआय केलं. गोपीनाथ मुंडे नसते तर हा महादेव जानकर मेंढरं राखत बसला असता. त्यामुळे महादेव जानकर मेला तरी चालेल पण ताईची कधीच साथ सोडणार नाही. 31 मे रोजी गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात कुर्रर्र केलंय,' असं जानकर म्हणाले.
नेता मिळणं अवघडं आहे
आजचा प्रोग्राम राजकीय नाही. हा पंकजा ताईंच्या शक्ती आणि युक्तीचा कार्यक्रम आहे. आमदार खासदार मिळतो पण नेता मिळत नाही. नेत्याला सांभाळणं हे आपलं काम आहे. मंत्री येतो आणि जातो, पण नेता कधी मरत नसतो. पंकजा यांचं हेलिकॉप्टर फिरलं नाही तर इथे आमदार खासदार तरी होतील का? नेत्याला सांभाळणं हे आपलं काम आहे. गोपीनाथ मुंडेंनी वंचितांची मोट बांधली. पंकजा मुंडेंच्या पाठी खंबीर राहा, असंही आवाहन महादेव जानकर म्हणाले.