जानकरांना हव्यात गेल्यावेळीपेक्षा दहापट जागा वाढवून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 11:30 AM2019-08-22T11:30:18+5:302019-08-22T11:32:17+5:30
रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपल्याला ५७ जागा हव्या असल्याचा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. मात्र असे असताना ही महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजूनही सुटू शकला नाही. एकीकडे भाजप-शिवसेना यांच्यात याच मुद्यावरून रस्सीखेच सुरु असतानाच, राष्टीय समाज पक्षाला भाजपकडून ५७ जागा मिळाव्यात अशी मागणी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केली आहे. गेल्यावेळी ६ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या रासपने यावेळी चक्क दहापटीने जागा वाढवून मागितल्या आहेत. तर गेल्या पाचवर्षात रासपची राज्यात वाढती ताकद पाहता ५७ जागा मागितल्याचा दावा जानकर यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत सुद्धा महायुती होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. महायुतीच्या जागावाटपात सेना-भाजपबरोबर मित्र पक्षांनाही काही जागा दिल्या जाणार आहेत. मात्र त्याआधीच रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपल्याला ५७ जागा हव्या असल्याचा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला आहे. गेल्यावेळी भाजपने ६ जागा रासपला दिल्या होत्या. त्यापैकी फक्त एका ठिकाणी आपला उमेदवार निवडणून आणण्यात जानकर यांना यश आले होते. मात्र आता त्यांनी चक्क दहापटीने जागा वाढवून मागीतील्या आहे.
राज्यात रासपची ताकद वाढली आहे. गेल्यावेळी 2 जिल्हा परिषद सदस्य असताना आम्हाला ६ जागा दिल्या होत्या. आता आमच्याकडे ९८ जिल्हा परिषद सदस्य, 3 सभापती, 2 नगराध्यक्ष, ६ उपसभापती आहेत त्यामुळे आम्हाला ५७ जागा द्यायला काहीच हरकत नसल्याचे जानकर म्हणाले. तसेच आम्ही निवडणुका आमच्याच पक्षाकडून लढवणार असून कमळाच चिन्ह नकोच असेही ते यावेळी म्हणाले.