शिवसेनेनंतर भाजपाचा आणखी एक मित्र दुरावणार; आगामी निवडणुका स्वबळावर लढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 05:45 PM2022-08-31T17:45:28+5:302022-08-31T17:50:54+5:30
कार्यकर्त्यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थेसह विधानसभा निवडणुकीत ‘एकला चलो रे’ भूमिका घेण्याची मागणी केली
प्रशांत ननवरे
बारामती - बारामती शहरात राष्ट्रीय समाज पक्षाचा १९ वा वर्धापनदिन उत्साहात पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभेच्या २८८ जागा स्वबळावर लढण्याचा आग्रह धरला असल्यानं ‘रासप’ ची भाजपावरील नाराजी यानिमित्ताने पुढे आली आहे. त्यामुळे शिवसेनेनंतर भाजपाचा आणखी एक मित्र साथ सोडणार का असा प्रश्न उपस्थित राहत आहे.
२०१४ मध्ये भाजपा शिवसेना महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये ‘रासप’ सहभागी झाला. मात्र सध्या भाजपा समवेत निकटचा संपर्क राहिला नसल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. शिवाय २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील काही घडामोडींमुळे रासप कार्यकर्ते पदाधिकारी भाजपावर नाराज असल्याचे समजते. त्यामुळे रासप पदाधिकाऱ्यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या कार्यकर्त्यांची बारामतीत बोलताना मनातील खदखद बाहेर आली आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या १९ वर्षाची वाटचालीबाबत पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. पक्षाच्या कार्याचा आढावा पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आला. कार्यकर्त्यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थेसह विधानसभा निवडणुकीत ‘एकला चलो रे’ भूमिका घेण्याची मागणी केली. तसेच पक्षाने स्वबळावर निवडणुका लढण्याची मागणी केली. यावर रासप प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाबाबत वरीष्ठ पातळीवर चर्चा करुन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
रासप तालुकाध्यक्ष अॅड.अमोल सातकर म्हणाले, हाकेला हाक देऊन हजारो कार्यकर्ते दिल्ली या ठिकाणी उपस्थित राहू शकतात ही खुप मोठी गोष्ट आहे. त्यामुळेच येणाऱ्या काळात महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्षाला विचारात घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही. कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे यांची रासपच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड जाहिर करण्यात आली. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवते, मुख्य महासचिव माऊली सलगर यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी मुख्य महासचिव माऊली सलगर, रविंद्र कोठारी,बाळासाहेब कोकरे,संजय माने, वैशालीताई विरकर, सुनील बंडगर, किरण गोफणे ,तानाजी मारकड, जोतीराम गावडे आदी उपस्थित होते. संदीप चोपडे, अॅड अमोल सातकर,विठ्ठल देवकाते, गिरीधर ठोंबरे, शाम घाडगे, शैलेष थोरात, लखण कोळेकर, अविनाश मासाळ, काका बुरूगंले, दादा भिसे,महादेव कोकरे आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले. सूत्रसंचालन कुमार देवकाते यांनी केले.