महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांना लाल दिवा निश्चित
By admin | Published: November 13, 2015 11:18 PM2015-11-13T23:18:03+5:302015-11-14T04:06:49+5:30
चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती : घटक पक्षांसह भाजपशिवसेनेच्या १० जणांचा मंत्रिमंडळात समावेश होणार
कोल्हापूर : गेले वर्षभर रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २७ नोव्हेंबरला होणार हे निश्चित झाले असून, यामध्ये घटक पक्षांसह भाजपच्या दहाजणांचा समावेश होणार आहे. ‘स्वाभिमानी’कडून सदाभाऊ खोत व ‘रासप’कडून आमदार महादेव जानकर यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत कोल्हापुरात दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लंडन दौऱ्यावर आहेत. ते परत आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होईल, असेही त्यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यांतून आमदार शिवाजीराव नाईक किंवा सुरेश खाडे यांच्यापैकी एकाला कुणालातरी मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. माजी मंत्री शिवाजारीव नाईक यांची अभ्यासू नेते म्हणून ओळख आहे. जिल्हा परिषदेचे ते अकरा वर्षे अध्यक्ष होते. युती शासनाच्या काळात त्यांनी राज्यमंत्रिपदही सांभाळले आहे. सगळ््यांना बरोबर घेवून जाणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. त्याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध आहे. नाईक यांना निवडून द्या, त्यांना कॅबिनेट मंत्री करण्याची जबाबदारी माझी असे गडकरी यांनी विधानसभेच्या प्रचारसभेतच जाहीर केले होते. त्यामुळे त्यांनाच ही संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्ताराला दिवाळीनंतरचा तरी मुहूर्त लागणार का? या प्रश्नावर बोलताना मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, ‘नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. साधारणत: २७ नोव्हेंबरचा मुहूर्त धरला असून यामध्ये दहाजणांचा शपथविधी होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सदाभाऊ खोत यांचे नाव आहे. ‘रिपाइं’च्या वतीने खासदार रामदास आठवले यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे; पण ते स्वत: तयार नाहीत; त्यामुळे त्यांची पत्नी अथवा दुसऱ्या नेत्यांचे नाव दिले जाऊ शकते. आमदार विनायक मेटे यांचाही मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. त्याशिवाय शिवसेनेच्या वाट्याला गेलेल्या दोन जागांचा विस्तारात समावेश आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर यांचाही समावेश होणार आहे. उर्वरित सहापैकी चौघाजणांना भाजपच्या वतीने संधी दिली जाणार आहे. राजकीय डावपेचाचा भाग म्हणून दोन जागा रिक्त ठेवल्या जाणार आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर महामंडळाचे अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. नोव्हेंबरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन आहे. त्यानंतर जानेवारीमध्ये महामंडळांवरील सर्व नियुक्त्या केल्या जाणार आहेत. आम्हाला राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पाठिंब्याची गरज भासणार नाही. भाजप-शिवसेनेमधील भांडणे कमी होऊन आम्ही पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करू, असा विश्वासही मंत्री पाटील यांनी व्यक्त केला. आमदार अमल महाडिक, भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव, उद्योगपती स्वरूप महाडिक, माजी महापौर सुनील कदम, नगरसेवक सत्यजित कदम, आदी उपस्थित होते.
महामंडळात पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप
मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राला न्याय दिला नसल्याची कार्यकर्त्यांची तक्रार आहे, याबाबत बोलताना मंत्री पाटील म्हणाले, आता गिरीश बापट, दिलीप कांबळे व आपण असे तीन मंत्री आहे. मंत्रिमंडळ विस्तारात सुरेश खाडे किंवा शिवाजीराव नाईक व सदाभाऊ खोत असे पाच मंत्री पश्चिम महाराष्ट्रातील होणार आहेत. त्यात आपल्याकडे जी खाती आहेत, ती कधीही पश्चिम महाराष्ट्राला मिळालेली नव्हती. महामंडळांवरील नियुक्त्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप मिळेल, अशी ग्वाहीही त्यांनंी दिली.
जानकर, खोत सातारा जिल्ह्याशी संबंधित
महादेव जानकर व सदाभाऊ खोत हे दोघेही सातारा जिल्ह्याशी संबंधित आहेत. पळसावडे (तालुका माण) हे जानकर यांचे गाव आहे, तर ‘स्वाभिमानी’चे सदाभाऊ खोत यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.