महाजेनकोच्या लिपिकपदाच्या उमेदवारांना उत्तरे सांगणा-या रॅकेटचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:14 PM2017-11-12T23:14:50+5:302017-11-12T23:23:49+5:30
महावीज निर्मिती (महाजेनको) कंपनीच्या लिपिकपदासाठी आॅनलाइन परीक्षा देणा-या उमेदवारांना मायक्रो इअरफोन, ब्ल्यू ट्रूथ आणि मोबाइलच्या मदतीने आॅनलाइन उत्तरे सांगणा-या रॅकेटचा मुकुंदवाडी पोलिसांनी रविवारी दुपारी पर्दाफाश केला. या कारवाईत चार जणांना पोलिसांनी पकडले असून, रॅकेटचा मुख्य सूत्रधार साथीदारासह पळून जाण्यात यशस्वी झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महावीज निर्मिती (महाजेनको) कंपनीच्या लिपिकपदासाठी आॅनलाइन परीक्षा देणा-या उमेदवारांना मायक्रो इअरफोन, ब्ल्यू ट्रूथ आणि मोबाइलच्या मदतीने आॅनलाइन उत्तरे सांगणा-या रॅकेटचा मुकुंदवाडी पोलिसांनी रविवारी दुपारी पर्दाफाश केला. या कारवाईत चार जणांना पोलिसांनी पकडले असून, रॅकेटचा मुख्य सूत्रधार साथीदारासह पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याच्यासह रॅकेटच्या मदतीने विविध सेंटरवर परीक्षा देणाºया उमेदवारांचा शोध पोलिसांनी सुरू केला.
जीवन गिरजाराम जघाळे (२१, रा. पाचपीरवाडी, ता. गंगापूर), नीलेश कपूरसिंग बहुरे (२३, रा. गेवराईवाडी, ता. पैठण) आणि पवन कडूबा नलावडे (११, रा. आपत भालगाव, ता. औरंगाबाद) आणि दत्ता कडूबा नलावडे, अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहेत. यावेळी अर्जुन घुसिंगे (रा. बेंबळ्याची वाडी) हा मुख्य आरोपी आणि त्याचा साथीदार गोविंदसह पळून गेला. पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, शासनाच्या महाजेनको कंपनीने राज्यात रविवार (दि.१२) नोव्हेंबर रोजी लिपिकपदासाठी आॅनलाइन परीक्षेचे आयोजन केले होते. लिपिकपदासाठी अर्ज दाखल करणाºया उमेदवारांना या परीक्षेत मेरीटमध्ये उत्तीर्ण करण्यासाठी प्रत्येकी सात ते आठ लाख रुपयांचा सौदा अर्जुन घुसिंगेने उमेदवारांशी केला. यातील ४० टक्के रक्कम अॅडव्हान्स तर उर्वरित रक्कम परीक्षेच्या निकालानंतर देणे, असा हा व्यवहार होता. उमेदवारांकडून उर्वरित रक्कम मिळावी, यासाठी अर्जुनने उमेदवारांची ओरिजनल शैक्षणिक कागदपत्रे त्याच्याकडे तारण म्हणून ठेवून घेतली होती. नंतर त्यांना परीक्षा फॉर्म भरण्यापासून ते परीक्षा सेंटर निवडणे, मायक्रो फोन, इअरफोन तो पुरवीत. शिवाय परीक्षेत तो कशी मदत करीन याबाबतचे प्रात्यक्षिक करून दाखवीत असे. गोपनीय पद्धतीने हे काम चालत. त्याच्या सांगण्यावरून औरंगाबाद जिल्ह्यातील उमेदवारांनी अहमदनगर येथील परीक्षा केंद्र निवडले. या रॅकेटचा सूत्रधार अर्जुन हा जयभवानीनगर येथे येणार असल्याची माहिती खबºयाकडून पोलिसांना मिळाली. यामुळे तेथे दोन पोलीस कर्मचारी त्याची प्रतीक्षा करीत थांबले होते. यावेळी तो आला आणि काही मिनिटांतच तेथून हडकोतील मयूरबन कॉलनीकडे दुचाकीने सुसाट निघाला. त्याच्या पाळतीवर असलेल्या पोलिसांनीही त्याचा पाठलाग करून मयूरबन कॉलनी गाठली. यावेळी तेथील दुसºया मजल्यावरील एका खोलीत बसलेल्या त्याच्या साथीदारांना अलर्ट करण्यासाठी तो रूमवर गेला. पोलीसही त्याच्यापाठोपाठ इमारतीवर चढले. तोपर्यंत अर्जुन दुसºया दरवाजातून तेथून निसटला. मात्र उत्तरे सांगण्यासाठी तेथे बसलेले दहा जण पोलिसांच्या हाती लागले.
महात्वाची कागदपत्रे जप्त
यावेळी झटापटीत आरोपी अर्जून याचा एक मोबाईल आणि लॅपटॉपची बॅग रूमध्ये पडली. ही बॅग, सहा मोबाईल, उमेदवारांना उत्तरे सांगण्यासाठी वापरण्यात येणारी स्पर्धा परीक्षेसंबंधीची आठ ते दहा पुस्तके पोलिसांनी जप्त केली. या कारवाईसाठी विशेष पोलीस अधिकारी असलेल्या तरूण मुलांची मदत झाली.
चौकट
अहमदनगरमधून फोडली प्रश्नपत्रिका
आरोपी अर्जून याने अत्यंत महागडे अशी मायक्रो ब्ल्यू ट्रुथ, वायरलेस सुपर स्मॉल मायक्रो ईअरफोन(न दिसणारे)असे साहित्य आॅनलाईन खरेदी केलेले आहेत. हे साहित्य अंतरवस्त्रात सहज लपवून त्याच्याशी कनेक्ट असलेल्या उमेदवारांना देऊन परीक्षा केंद्रात पाठविले. आॅनलाईन परीक्षा सुरू होताच एक उमेदवार त्याच्याकडील मायक्रो स्पाय कॅमेरा चालू करीत. हा कॅमेरा प्रश्नपत्रिकेसमोर नेताच तो कॅमेरा प्रश्नपत्रिका स्कॅन करून ईमेलद्वारे अर्जूनच्या ई-मेलवर येत. प्रश्नपत्रिका प्राप्त होताच रूममध्ये बसलेले आठ ते दहा जण त्यांच्याकडील गाईडचा वापर करून उत्तरे शोधून काढत. सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतर ते त्यांच्याशी कनेक्ट असलेल्या उमेदवारांना दिलेल्या मायक्रो ईअरफोनवर संपर्क साधून त्यांना उत्तरे सांगत.
औरंगाबादेतून सांगितली पाच मिनीटात उत्तरे
उमेदवार केवळ मायक्रो ब्ल्यू ट्रुथ कानात आतमध्ये घालून परीक्षा हॉलमध्ये जात. तर मायक्रो जीएसएम फोन ते त्यांच्या बॅगमध्ये परीक्षा हॉलबाहेर ठेवत. या ब्ल्यू ट्रुथच रेंज मर्यादा ५०० फुट असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे मायक्रो फोन औरंगाबादेतून कॉल करून उत्तरे सांगणाºयाच्या एका रिंगनंतर अॅटोमेटिक ब्ल्यु ट्रुथशी कनेक्ट होत. औरंगाबादेतील रूममध्ये बसलेले तरूण केवळ प्रश्न नंबर आणि त्याच्या उत्तराचा क्रमांक वेगात सांगत. यामुळे अवघ्या पाच ते सहा मिनीटात उमेदवाराला अचूक उत्तरे मिळत.
कामगिरी करणाºयांना ५०हजाराचे बक्षीस
ही कारवाई पोलीस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, पोलीस उपनिरीक्षक शेख हारूण, सहायक उपनिरीक्षक कौतीक गोरे, कर्मचारी असलम शेख, कैलास काकड, प्रकाश सोनवणे, विजय चौधरी , एसपीओ कैलास वळेकर, विजय घोरपडे, गोवर्धन उगले,दिलीप डुकरे, कैलास मते यांनी केली. पोलीस आणि एसपीओ यांना प्रत्येकी २५ हजार रूपये बक्षीस देण्याचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी जाहिर केले.