महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कारांची घोषणा!
By admin | Published: September 1, 2014 04:00 AM2014-09-01T04:00:20+5:302014-09-01T04:00:20+5:30
राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कारांची घोषणा शनिवारी करण्यात आली.
मुंबई : राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कारांची घोषणा शनिवारी करण्यात आली. यामध्ये प्राचीन संस्कृत पंडित पुरस्कार पुणे येथील डॉ. देवदत्त पाटील यांना तर संस्कृत साधनेत महत्त्वाचा समजला जाणारा वेदमूर्ती पुरस्कार नागपूर येथील आर्वीकर वेद पाठशालाचे वेदाचार्य कृष्ण गोविंद आर्वीकर यांना जाहीर झाला आहे.
संस्कृत भाषेच्या प्रचार, प्रसारसोबतच संशोधन, प्रकाशन, अध्ययन, अध्यापन आणि संस्कृतविषयक उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील सात आणि देशातील कोणत्याही राज्यातील एका अशा आठ व्यक्तींना उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार देण्यात येतो. २०१४ सालच्या महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि २५ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लवकरच मुंबई, पुणे किंवा नाशिक येथे हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)