‘महानंदा’ची रोज ४ लाख लीटर विक्री
By Admin | Published: June 1, 2016 02:26 AM2016-06-01T02:26:07+5:302016-06-01T02:26:07+5:30
राज्यात सकस गाय दूध पुरवठा करणारी शिखर संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद) रोज सरासरी साडेतीन ते चार लाख लीटर दूध तर आठ ते दहा टन दुग्धजन्य पदार्थाची विक्री होत
मुंबई : राज्यात सकस गाय दूध पुरवठा करणारी शिखर संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद) रोज सरासरी साडेतीन ते चार लाख लीटर दूध तर आठ ते दहा टन दुग्धजन्य पदार्थाची विक्री होत आहे, अशी माहिती ‘महानंदा’च्या अध्यक्षा मंदाकिनी एकनाथ खडसे यांनी दिली. महासंघाची वार्षिक उलाढाल ६०० कोटींच्या घरात असून त्यामध्ये वृद्धी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
सात एप्रिलला महासंघाच्या अध्यक्षपदी खडसे व उपाधयक्षपदी ज्ञानेश्वर पवार यांची नियुक्ती झालेली आहे. महासंघाच्या कामगिरीचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, राज्य व केंद्र शासनाने नोडल एजन्सी म्हणून महासंघाची नियुक्ती केल्यानुसार विविध योजना राबविण्यात आल्या. त्यात दुग्धव्यवसाय विकासाचा विदर्भ व मराठवाड्यासाठी विशेष कार्यक्रम, सधन दुग्धविकास प्रकल्प - ३ अशा विविध प्रकल्पांचा समावेश आहे. दूध महासंघाच्या व्यवसायाचे विस्तारीकरण करण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाने महानंद दुग्धशाळा गोरेगाव येथे असेप्टिक डेअरी प्लांट उभारण्यात आला. या प्लँटची प्रतिदिन १ लक्ष लिटर्स दूध हाताळणी क्षमता आहे. सध्या अॅसेप्टीक प्लँटमध्ये टेट्राफिनो व टेट्राब्रिकचे उत्पादन केले जाते. राज्यातील लाखो शेतकरी दूध उत्पादकांना आर्थिक लाभ मिळण्याकरिता दूध महासंघ प्रयत्नशील आहे. त्यासाठी मुंबई शहरात व नवी मुंबई परिसरात भविष्यात अधिकाधिक विक्री केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तसेच, महानंदचे अत्याधुनिक तंत्राने प्रक्रिया व पॅकिंग केलेले व्होलसम दूध टेट्रापॅकमध्ये शहराच्या विविध मॉल्स आणि दुकानांमध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध करण्यात येईल.
महासंघाविषयी अधिक माहिती देताना मंदाकिनी खडसे यांनी सांगितले की, महासंघाचा उद्देश राज्यातील दूध संघांकडून जास्तीत जास्त दूध संकलित करुन ग्राहकांना कमीत कमी दरात दूध उपलब्ध करुन देणे हा आहे. जवळपास २५ लाख दूध उत्पादक शेतकरी हे सभासद जिल्हा आणि तालुका दूध संघामार्फत दूध महासंघाशी संलग्न आहेत. जिल्हा दूध संघ २५ आहेत, तर तालुका दूध संघ ६० आहेत. तसेच, राज्यभरात दूध महासंघाचे दुग्धशाळा प्रकल्प गोरेगाव, नागपूर, लातूर, पुणे, वैभववाडी, वरवंड येथे आहेत. गुणनियंत्रण विभागाच्या फूड सेफ्टी स्टँडर्ड आॅथोरिटी आॅफ इंडिया (एफएसएसएआय) यांनी नेमून दिलेल्या २२ परिक्षणांमधून उत्तम असलेलेच निर्भेळ व सकस दूध ग्राहकांना कमीत कमी दरात उपलब्ध करुन देणे हा महासंघाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे वरवंड येथे असणाऱ्या दूध भुकटी प्रकल्पाबद्दल मंदाकिनी खडसे यांनी माहिती देताना सांगितले की, डिसेंबर २०१४ पासून हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारण्यात आला. या प्रकल्पाची ३ .५ लक्ष लिटर्स दूध प्रतिदिन हाताळण्याची क्षमता आहे. त्यापासून ३०मे. टन दूध भुकटी प्रतिदिन व १५ मे. टन पांढरे लोणी प्रतिदिन उत्पादित करण्याची क्षमता आहे. (प्रतिनिधी)