महामानवाच्या गावाचा होणार कायापालट !
By admin | Published: April 14, 2016 01:19 AM2016-04-14T01:19:33+5:302016-04-14T01:19:33+5:30
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे आता कात टाकू लागले आहे. हे गाव खासदार अमर साबळे यांनी दत्तक घेतले आहे. या गावाचा तब्बल ३६९ कोटींचा विकास आराखडा तयार
- शिवाजी गोरे, दापोली (जि. रत्नागिरी)
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे आता कात टाकू लागले आहे. हे गाव खासदार अमर साबळे यांनी दत्तक घेतले आहे. या गावाचा तब्बल ३६९ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. ६५ कि. मी. अंतराचा वाढीव मार्ग उभारून आंबडवे गाव महामार्गाला जोडण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केला आहे.
महामानवाच्या गावात नतमस्तक होण्यासाठी लाखो बौद्ध बांधव दरवर्षी आंबडवेत येतात. मात्र, या ठिकाणी पायाभूत सुविधा नसल्याने त्यांचे हाल होतात. आता या गावाची उपेक्षा दूर होण्याची वेळ आली असून विकास आराखड्यानुसार कामे होतील, असे प्रयत्न सुरू झाले आहेत. आदर्श संसद ग्राम योजनेंतर्गत या गावाची निवड झाल्यानंतर या गावाचा विकास आराखडा बनविण्यात आला. ३६९ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यात भव्य स्मारक, शिल्पसृष्टी, विपश्यना केंद्र, वाचनालय, विश्रामगृह, सुलभ शौचालय, सुसज्ज रस्ते, मुबलक पाणी, आरोग्य केंद्र, शाळा, कॉलेज, बँक, क्रीडा संकुलचा समावेश आहे. त्यासाठी जयंती आयोजन समिती यापूर्वीच स्थापन झाली आहे. जयंतीनिमित्त पंचसूत्रीचा विकास करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पंचसूत्रीमध्ये आंबडवे गावाचा समावेश आहे.
रमाई यांच्या गावात विकासकामे सुरू
महामानव बाबासाहेबांची माता रमाई यांचे माहेर वणंद. या वणंद गावाचा ४० कोटी रुपयांचा विकास आराखडाही सरकारने तयार केला आहे. आमदार भाई गिरकर यांनी हे गाव दत्तक घेतले असून, प्रत्यक्ष विकासकामाला सुरुवात झाली आहे. दापोली ते वणंद रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
‘लोकमत’कडून सातत्याने पाठपुरावा
मोठ्यांची छोटी गावे या मालिकेतून ‘लोकमत’ने आंबडवे आणि वणंद या दोन गावांकडे होत असलेल्या दुर्लक्षावर प्रकाश टाकला होता. त्याचा सातत्याने पाठपुरावा करणारी वृत्ते ‘लोकमत’ने दिली. त्यामुळेच या गावांमधील कामांना गती आली आहे.