मंडणगडमध्ये महाआघाडीच ! शिवसेनेचे पानिपत

By admin | Published: November 2, 2015 10:26 PM2015-11-02T22:26:05+5:302015-11-03T00:01:34+5:30

पहिल्याच निवडणुकीत महाआघाडीचा झेंडा भाजपचाही धुव्वा; रत्नागिरीत आघाडी २, सेनेला २ जागा

Mahangadi in Mandangad! Shivsena's Panipat | मंडणगडमध्ये महाआघाडीच ! शिवसेनेचे पानिपत

मंडणगडमध्ये महाआघाडीच ! शिवसेनेचे पानिपत

Next

रत्नागिरी/मंडणगड : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रभुत्व गाजविणाऱ्या शिवसेनेला मंडणगड नगरपंचायतीच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत सोमवारी महाआघाडीने ‘दे धक्का’ दिला. नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ९मध्ये समसमान मते मिळाल्याने चिठ्ठी टाकून निर्णय घेण्यात आला, तो निकाल सेनेच्या बाजूने लागला. रत्नागिरी नगरपरिषदेच्या चार जागांच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या.
मंडणगड नगरपंचायतीच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र, याठिकाणी सुरुवातीपासूनच महाआघाडीने आपले वर्चस्व राखले. सोमवारी तहसीलदार कार्यालयात सकाळी १० वाजता ही मतमोजणी घेण्यात आली आणि पहिल्या तासाभरातच हे निकाल जाहीर झाले. मंडणगडमध्ये युती नसल्याने शिवसेना आणि भाजपच्या मतांची विभागणी झाली आणि त्याचा फायदा महाआघाडीला मिळाल्याचे चित्र दिसून आले.
मंडणगडात एकूण १७ जागा होत्या. त्यापैकी १६ जागी महाआघाडीने आपले वर्चस्व राखले. प्रभाग क्रमांक ९मध्ये सेनेच्या दक्षता सापटे व राष्ट्रवादीच्या श्वेता सापटे यांना प्रत्येक ६३ मते मिळाली. या प्रभागात समसमान मतदान झाल्याने चिठ्ठी टाकून मिळालेल्या एका मताच्याआधारे सेनेच्या दक्षता सापटे विजय झाल्या. या विजयाने शिवसेनेने मंडणगडात आपले खाते खोलले. त्यामुळे मंडणगडमध्ये महाआघाडीसमोर विरोधी पक्षच नसल्याचे चित्र आहे.
रत्नागिरी नगरपालिकेत चार जागांच्या पोटनिवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील सामना मतमोजणीनंतर बरोबरीत सुटला. सकाळी झालेल्या मतमोजणीत शिवसेनेने प्रभाग २ मधील दोन्ही जागांवर विजय प्राप्त केला. प्रभाग चारमध्ये राष्ट्रवादीच्या उमेश शेट्ये व रुबिना मालवणकर या दोन उमेदवारांनी विजय संपादन केला.
रत्नागिरीतील राष्ट्रवादीची ताकद खालसा करण्याचा विरोधकांचा प्रयत्न मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादीने हाणून पाडल्याचे सांगितले जात आहे. उमेश शेट्ये यांच्या स्नुषा कौसल्या शेट्ये यांना मात्र निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला आहे. (प्रतिनिधी)

शिवसेनेचे पानिपत
मंडणगड नगरपंचायत : पहिल्याच निवडणुकीत महाआघाडीचा झेंडा
मंडणगड : मंडणगड नगरपंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीत शिवसेना पूर्णपणे भुईसपाट झाली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस (आय) व आरपीआयाच्या महाआघाडीला १७ जागांपैकी सोळा जागा मिळाल्या. प्रभाग क्रमांक ९मध्ये समान मतांमुळे चिठी टाकून कौल घेण्यात आला. त्याद्वारे सेनेने आपले खाते उघडले. मतदारांनी सेना व भाजप यांना स्पष्टपणे नाकारले.
उमेदवारांना मिळालेली प्रभागनिहाय मते व विजयी उमेदवार : प्रभाग १ काँग्रेसच्या बेबी गोरे यांना ३५, तर भाजपच्या अश्विनी बकरे यांना १६ मते मिळाली. प्रभाग २ मध्ये एकूण ८५ मतदान झाले. यात राष्ट्रवादीच्या आरती तलार विजयी झाल्या. त्यांना ४६ मते मिळाली. प्रभाग ३मध्ये एकूण ११३ मतदान झाले. यामध्ये राष्ट्रवादीचे शांताराम भेकत यांना ४५, तर सेनेचे राजेंद्र गोरीवले यांना ३२ मते मिळाली. ४मध्ये राष्ट्रवादीचे सुभाष सापटे यांना १०३ मते मिळवून ते विजयी झाले, सेनेचे जितेंद्र सापटे यांना ४५ मते मिळाली. प्रभाग ५मध्ये १४५ ुइतके मतदान झाले. यात राष्ट्रवादीच्या श्रुती साळवी यांना ८१, तर सेनेच्या शीतल गोरीवले यांना ५५ मते मिळाली.
प्रभाग ६मध्ये राष्ट्रवादीचे सचिन बेर्डे यांना ९३, तर सेनेचे उदय गुजर यांना ६० मते मिळाली. प्रभाग ७मध्ये एकूण १७७ मतदान झाले. यात आरपीआयचे उमेदवार आदेश मर्चंडे ८५ मते मिळवून विजयी झाले, तर सेनेचे विनोद जाधव यांना ८० मते मिळाली. प्रभाग ८मध्ये एकूण १०९ मतदान झाले. यात राष्ट्रवादीचे दिनेश लेंडे यांना ५१, तर सेनेचे बबन लेंडे यांना ३८ मते मिळाली.
प्रभाग ९मध्ये १३१ इतके मतदान झाले. यात सेनेच्या दक्षता सापटे व राष्ट्रवादीचे श्वेता सापटे यांना प्रत्येकी ६३ मते मिळाली. भाजपच्या स्वप्नाली दुर्गवले यांना ५ मते मिळाली. दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्यो चिठीचा कौल घेण्यात आला. हा कौल सेनेच्या दक्षता सापटे यांच्या बाजूने गेल्याने त्या विजयी झाल्या.
प्रभाग १०मध्ये १७० इतके मतदान झाले. यात काँग्रेसच्या श्रध्दा लेंडे १२१ मते मिळवून विजयी झाल्या. सेनेच्या सुषमा राणे यांना ३१ मते मिळाली. प्रभाग ११मध्ये एकूण ७६ मतदान झाले. यात आरपीआयचे राजेश मर्चंडे ४० मते मिळवून विजयी झाले. अपक्ष हरेश मर्चंडे यांना ३५ मते मिळाली. प्रभाग १२मध्ये ८२ मतदारांनी मतदान केले. यात काँग्रेसच्या स्नेहल मांढरे ५० मते मिळवून विजयी झाल्या. अपक्ष पूर्वा यादव यांना ३२ मते मिळाली.
प्रभाग १३मध्ये १२६ मतदारांनी मतदान केले. यात राष्ट्रवादीचे कमलेश शिगवण ६४ मते मिळवून विजयी झाले. सेनेचे सुधीर हातमकर यांना ५९ मते मिळाली. प्रभाग १४मध्ये ९४ मतदारांनी मतदान केले. यात काँग्रेसचे राहुल कोकाटे ४५ मते मिळवून विजयी झाले. सेनेचे सुधीर तांबीटकर यांना ३७ मते मिळाली.
प्रभाग १५मध्ये ९० मतदारांनी मतदान केले. यात राष्ट्रवादीच्या नेत्रा शेरे ४१ मते मिळवून विजयी झाल्या. सेनेच्या प्रमिला कामेरीकर यांना ३९ मते मिळाली. प्रभाग १६ मध्ये ८४ मतदारांनी मतदान केले. यात काँग्रेसच्या वैशाली रेगे ४८ मते मिळवून विजयी झाल्या. भाजपच्या मनीषा अधिकारी यांना २१ मते मिळाली. प्रभाग १७मध्ये १२२ मतदारांनी मतदान केले. यात राष्ट्रवादीच्या प्रियांका शिगवण ७० मते मिळवून विजय झाल्या.
राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतर मित्रपक्षांनी मिळून केलेल्या या आघाडीने युतीमधील धुसफुसीचा चांगलाच फायदा उठवत एकहाती यश खिशात घातले. (प्रतिनिधी)

Web Title: Mahangadi in Mandangad! Shivsena's Panipat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.