कुंभमेळ्यावर महंत ग्यानदास यांचा बहिष्कार
By admin | Published: February 28, 2015 05:04 AM2015-02-28T05:04:28+5:302015-02-28T05:04:28+5:30
पर्यायी शाहीमार्ग साधू-महंतांनी स्वीकारल्यानंतरही त्याची फेरपाहणी करून निर्णय घेण्यात येणार असल्याने आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास संतप्त झाले
नाशिक : पर्यायी शाहीमार्ग साधू-महंतांनी स्वीकारल्यानंतरही त्याची फेरपाहणी करून निर्णय घेण्यात येणार असल्याने आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास संतप्त झाले आहेत. या सर्व प्रकारास पोलीस आयुक्त हेच जबाबदार असून, त्यांना न हटविल्यास कुंभमेळ्यास येणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक घेतली. या वेळी पर्यायी शाहीमार्गाची फेरपाहणी करण्यास सांगितले होते.
या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त नवीन मार्गाबाबत नागरिक आणि साधू-महंतांची दिशाभूल करीत आहेत, त्यामुळे त्यांना तातडीने हटवावे, अशी मागणी यापूर्वीच राज्य सरकारकडे आपण केली होती, ती अद्याप मान्य झालेली नाही, त्यामुळे आता नाशिकच्या कुंभमेळ्यास येणारच नसल्याचे महंत ग्यानदास यांनी शुक्रवारी सांगितले.
कुंभमेळ्यात पर्वणीच्या दिवशी तपोवन ते रामकुंड अशी साधू-महंतांचे आखाडे तसेच खालसे यांची मिरवणूक निघते. सरदार चौकात अरुंद मार्ग असल्याने तेथे गेल्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी होऊन २८ जण ठार झाले होते. त्यामुळे यंंदा या अरुंद मार्गाऐवजी काट्यामारुती चौकी येथून काळाराम मंदिराकडे न जाता गणेशवाडी मार्गे गाडगे महाराज पुलाखालून मिरवणूक रामकुंडाकडे न्यावी असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी मांडला. तो महंत ग्यानदास यांनी स्वीकारला होता. तथापि, पोलीस आयुक्तांची या मार्गास अनुकूलता नव्हती. त्यामुळे महंत ग्यानदास नाराज आहेत. (प्रतिनिधी)