महंत मोहनदास बेपत्ता; आखाडा परिषद चिंतित, अपहरणाची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 02:32 AM2017-09-26T02:32:06+5:302017-09-26T02:32:23+5:30
राम रहिम, आसाराम बापू यांच्यासारख्या बाबांना भोंदू ठरविणा-या देशभरातील साधू-महंतांच्या आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्तेमहंत तथा श्री. पंचायती आखाडा बडा उदासीन हरिद्वारचे कोठारी महंत मोहनदास हे प्रवासादरम्यान बेपत्ता झाले आहेत.
नाशिक : राम रहिम, आसाराम बापू यांच्यासारख्या बाबांना भोंदू ठरविणा-या देशभरातील साधू-महंतांच्या आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्तेमहंत तथा श्री. पंचायती आखाडा बडा उदासीन हरिद्वारचे कोठारी महंत मोहनदास हे प्रवासादरम्यान बेपत्ता झाले आहेत.
१० दिवस उलटूनही त्यांचा शोध न लागल्याने अखिल भारतीय षटदर्शन आखाडा परिषदेने चिंता व्यक्त केली आहे. त्र्यंबकेश्वर येथे सोमवारी सकाळी आखाडा परिषदेची स्वामी सागरानंद यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक झाली.
महंत मोहनदास हे १५ सप्टेंबरला हरिद्वारहून मुंबईकडे रेल्वेने निघाले, मात्र बेपत्ता झाले. हरिद्वारचे जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख तसेच उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करण्यात आली.
हरिद्वारच्या पोलीस अधिकाºयांचे पथकही त्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहे, अशी माहिती परिषदेचे महामंत्री महंत हरिगिरी महाराज यांनी दिली.
आखाडा परिषदेने देशभरातील भोंदू बाबांची यादी जाहीर केल्यानंतर मोहनदास यांना अनोळखी व्यक्तींकडून धमकीचे फोन येत होते. त्यांनी पोलिसांत तक्रारही केली होती. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर महंत मोहनदास यांचे संबंधित गुंडांकडून अपहरण करण्यात आले, अशी शंका हरिगिरी महाराज यांनी व्यक्त केली.
मेरठपर्यंत महंत मोहनदास यांच्या मोबाईलचे लोकेशन मिळत आहे, त्यानंतर मात्र फोनही लागत नाही. परिषदेचे प्रवक्ते योगीराज डॉ. बिंदूजी महाराज यांनीही सरकार अद्यापही महंतांचा शोध न घेऊ शकल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.