‘महापरिनिर्वाणदिनी राजकीय सभा नकोत’
By admin | Published: November 23, 2015 02:18 AM2015-11-23T02:18:35+5:302015-11-23T02:18:35+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी लाखोंच्या संख्येने अनुयायी दादरमधल्या शिवाजी पार्कसह चैत्यभूमी परिसरात येतात.
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी लाखोंच्या संख्येने अनुयायी दादरमधल्या शिवाजी पार्कसह चैत्यभूमी परिसरात येतात. या दिवसाचे निमित्त साधून सगळेच राजकीय पक्ष सभांचे आयोजन करतात आणि शिवाजी पार्कमध्ये ही आता प्रथाच पडली. मात्र, यंदापासून अशा सभा होऊ नयेत, यासाठी थेट पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यानेच या संबंधीचे पत्र पालिकेला पाठविले आहे. कोणत्याही राजकीय पक्षांच्या सभांसाठी व्यासपीठ बांधण्यास परवानगी देऊ नये, असे पोलिसांनी पत्रात म्हटले आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून महापरिनिर्वाणदिनी शिवाजी पार्कवर विविध पक्षांच्या सभांचे आयोजन होत असते. त्यात रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे या नेत्यांच्याही सभांचा समावेश असतो. गेल्या वर्षी सभेदरम्यान गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. दोन गटांमध्ये झालेल्या वादांत सगळ्याच उपस्थितांना मनस्तापाला सामोरे जावे लागले होते. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. महापरिनिर्वाणदिनी शिवाजी पार्कवर राजकीय सभेला परवानगी देऊ नये, अशी भूमिका आता पोलिसांनी घेतली आहे.