राज्यात उद्योगांसाठी महापरवाना - सुभाष देसाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 07:04 AM2020-05-14T07:04:37+5:302020-05-14T07:05:13+5:30
गुंतवणूकदारांना तातडीने ‘महापरवाना’ देण्याचा निर्णय याच अनुषंगाने घेतल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी जाहीर केले.
औरंगाबाद : जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांनी कोरोनामुळे आता भारताकडो मोर्चा वळविण्यास सुरुवात केली असून, राज्यात लवकरच मोठी गुंतवणूक होईल. विशेषत: डीएमआयसीअंतर्गत असलेल्या आॅरिक सिटीमध्ये परकीय गुंतवणूकदारांना सवलती असतील. गुंतवणूकदारांना तातडीने ‘महापरवाना’ देण्याचा निर्णय याच अनुषंगाने घेतल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी जाहीर केले.
कोरोना प्रादुर्भाव आणि उपाययोजना या अनुषंगाने देसाई
यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, राज्याचा उद्योग विभाग अमेरिका, जर्मनी, जपान, तैवान येथील उद्योजकांशी बोलणी आणि वाटाघाटी करीत आहे. त्यांच्यासोबत दोन बैठका झाल्या आहेत. ते उद्योग जाऊ नयेत यासाठी सवलती देण्यात येणार आहेत. सर्व सुविधांसह ४० हजार हेक्टर जमीन राज्यात उपलब्ध आहे. सध्या गुंंतवणूकदारांचे नाव जाहीर करणे योग्य नाही; परंतु परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येईल.
राज्यात ६४ हजार, ४९३ पैकी
३४, ८२१ उद्योग सुरू झाले असून, ९ लाख, १७ हजार कामगार कामावर येत आहेत. कामगारांची काळजी घ्यावी, असे आवाहनही देसाई यांनी केले.
कामगार ब्युरोची स्थापना
कोरोनामुळे कामगार, मजुरांनी मोठ्या संख्येने स्थलांतर केले असून रिक्त जागांची मोठी पोकळी स्थानिक भूमिपुत्रांनी भरून काढावी. कुशल आणि अकुशल कामगार उद्योगांना मिळावेत, यासाठी उद्योग आणि कामगार विभाग मिळून कामगार ब्युरोची स्थापना करीत आहेत. यातून उद्योगांना आठवड्यात कामगारांचा पुरवठा केला जाईल. असे उद्योगमंत्री देसाई म्हणाले.