सातपुड्यात दवांचा बर्फ; तापमान आले ६ अंशांवर; काश्मीरसारख्या थंडीचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 06:26 AM2024-12-12T06:26:57+5:302024-12-12T06:27:23+5:30
सातपुड्यातील उंच शिखरावर असलेल्या व अक्कलकुवा तालुक्यातील डाब, वालंबा परिसरात दरवर्षी जानेवारी महिन्यात किमान तापमान ५ ते ६ अंशांवर जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सातपुड्यातील चौथ्या पर्वतरांगेत उंच पठारावर असलेल्या डाब, वालंबा परिसरात किमान तापमान ५ ते ६ अंशांवर गेले आहे. त्या भागात पहाटेच्या वेळी दवबिंदू गोठत असल्याने परिसरात पांढरी चादर पसरल्याचा भास होत आहे.
सातपुड्यातील उंच शिखरावर असलेल्या व अक्कलकुवा तालुक्यातील डाब, वालंबा परिसरात दरवर्षी जानेवारी महिन्यात किमान तापमान ५ ते ६ अंशांवर जाते. यंदा मात्र डिसेंबर महिन्यातच किमान तापमान ६ अंशांवर गेले आहे. त्यामुळे मंगळवार व बुधवारी दवबिंदू गोठल्याचे दिसून आले. पहाटे तीन वाजेपासून सकाळी आठ वाजेपर्यंत दवबिंदू गोठलेल्या स्थितीत राहत असल्याने बर्फाची चादर पसरल्याचे चित्र गाव, पाड्यातील घरांचे छत, वाहनांचे टप, पिकांवर दिसून येत आहे. दिवसभर गारठा कायम राहत आहे.
सिकरमध्ये तापमान १.५ अंश सेल्सिअस
राजस्थानच्या सिकरमध्ये तापमान १.५ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. राज्यात अनेक भागांत तापमान १.५ ते १०.८ अंश सेल्सिअस इतके होते.
गुलमर्ग उणे ६ अंशांवर
काश्मिरात श्रीनगरमधील तापमान शून्य ते उणे ३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. आदल्या दिवशी तापमान शून्य ते उणे ५.४ अंश सेल्सिअस होते. उत्तर काश्मिरातील प्रसिद्ध स्की रिसॉर्ट गुलमर्गमध्ये रात्रीचे तापमान शून्य ते उणे सहा अंश सेल्सिअस नोंदले गेले.
दिल्लीतही हुडहुडी
राजधानी दिल्लीत बुधवारी यंदाचे सर्वांत कमी म्हणजे ४.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. गतवर्षीही १५ डिसेंबरला किमान तापमान ४.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते.