महाराज पाच रुपये घ्या अन् मठात बसा, राजकारण हे तुमचे काम नाही, शरद पवार यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 12:18 PM2019-04-04T12:18:45+5:302019-04-04T12:36:32+5:30
महाराजांना सांगू या, महाराज नमस्कार, ही पाच रुपयाची नोट घ्या आणि मठात जाऊन बसा. राजकारण हे तुमचे काम नाही, अशी टीका माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी बुधवारी येथे केली.
सोलापूर - साधू संत कधी कोणाकडे मागत नाहीत, मागणारा संत असूच नाही. सोलापुरात मला मताचा शिक्का द्या म्हणणारा महाराज मी देव आहे, असे सांगत असल्याचे वाचले. राजकारण हे महाराजांचे काम नाही व ही भोंदुगिरी समाज आणि देशाच्या हिताची नाही. त्यामुळे अशा महाराजांना सांगू या, महाराज नमस्कार, ही पाच रुपयाची नोट घ्या आणि मठात जाऊन बसा. राजकारण हे तुमचे काम नाही, अशी टीका माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी बुधवारी येथे केली.
सोलापूर लोकसभा काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभा झाली. भाजपने नऊ, दहा महाराज निवडून आणले. हे महाराज भगवे कपडे घालून बसले संसदेत, पण गेल्या पाच वर्षात यांनी कधी तोंड उघडलं नाही की एक प्रश्न विचारला नाही. मी कोणत्याही महाराजांचा अनादर करीत नाही. पण महाराजांनी मठात जायचे सोडून इकडे कुठं. एका महाराजाला विचारलं कसं चाललंय म्हणून. महाराज म्हणाले परमेश्वर की कृपा है, आज बेहतर है, कल या परसो बेहतर होगा. सबका कल्याण करेंगे, म्हणाले. काय कल्याण, इकडे प्यायला पाणी नाही, तरुणांना नोकऱ्या नाहीत त्याचे काय? दिल्लीचं हे वारं सोलापुरातही आलेले
पाहून नवल वाटलं. पण सोलापूर हे पुरोगामी विचारांचे शहर आहे. लोक अशा गोष्टींना थारा देणार नाहीत, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
सहकारमंत्री देशमुख यांचा पूरक अर्ज
सहकारमंत्री सुभाष देशमुख निवडणूक यांनी बुधवारी भाजपतर्फे पूरक अर्ज दाखल केला. त्याचवेळी शरद पवार आणि संजय शिंदे निवडणूक कार्यालयात आले. देशमुख आत आहेत, असे सांगितल्यानंतर पवारांनी आत जाण्यास नकार दिला. त्यांचा उमेदवारी अर्ज भरुन होऊ द्या. त्यानंतर आपण जाऊ, असे म्हणत ते कार्यालयाबाहेरील खुर्चीवर बसले. बाहेर आल्यानंतर सुभाष देशमुखांनी शरद पवार यांना नमस्कार केला. त्यानंतर पवार आत गेले.