हागणदारीमुक्तीत महाराष्ट्र गुजरातच्या पुढे!
By admin | Published: December 27, 2016 03:50 AM2016-12-27T03:50:29+5:302016-12-27T03:50:29+5:30
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील १० हजार ७७० ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या असून सिंधुदूर्ग नंतर आता सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर
मुंबई : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील १० हजार ७७० ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या असून सिंधुदूर्ग नंतर आता सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर हे जिल्हे हागणदारीमुक्त घोषित झालेले आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
देशात दुसऱ्या क्रमांकावर गुजरात (६३२४ गावे) तर तिसऱ्या क्रमांकावर उत्तराखंड (५६०४) राज्य आहे. महाराष्ट्रात ५९ तालुके हागणदारीमुक्त झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबर २०१४ रोजी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या कार्यक्रमाची घोषणा केली होती. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त देश हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे. देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र ग्रामीण स्वच्छतेत प्रचंड वेगाने पुढे जात असल्याचेही लोणीकर यांनी सांगितले. महाराष्ट्रामध्ये १८ लाख शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी थेट लोकांपर्यंत जावून वैयक्तिक शौचालय बांधून त्याचा वापर व्हावा यासाठी राज्यभर नुकतेच एक अभियान राबविण्यात आले. . २२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छ महाराष्ट्रासाठी अठरा लाख भेटी’ या नावाने हे अभियान राबवले. (विशेष प्रतिनिधी)