त्रिपुरा हिंसाचाराची आग महाराष्ट्रापर्यंत; अमरावतीत आज पुन्हा राडा, जाळपोळ, कलम 144 लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 01:54 PM2021-11-13T13:54:58+5:302021-11-13T13:55:39+5:30
लालखडी परिसर, चांदनी चौक, पठान चौक भागात आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अमरावती बंदला हिंसक वळण मिळाले.एवढेच नाही, तर नमुना गल्ली भागात तलवारी घेतलेले युवक घोषणाबाजी करीत होते, असेही समजते. या संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण असून कडक पोलीस बंदोबस्त आहे.
अमरावती- त्रिपुरा हिंसाचाराची आग महाराष्ट्रापर्यंत पसरली आहे. त्रिपुरात झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात अमरावतीमध्ये दोन दिवसांपासून राडा सुरू आहे. येथे, शुक्रवारी त्रिपुरा हिंसाचाराविरोधात अनेक मुस्लीम संघटनांनी निदर्शने केली. यावेळी मोठी गर्दी दिसून आली. आता या विरोधात हिंदू संघटनांनी शनिवारी बंदचे आवाहन केले होते. मात्र, यावेळी निदर्शकांनी जबरदस्त राडा केला. हे थांबवण्यासाठी पोलिसांनाही लाठीचार्ज करावा लागला. आता अमरावतीत कलम 144 लागू करण्यात आले आहे.
भाजप आणि समविचारी पक्षानी शनिवारी पुकारलेला हा बंद कडकडीत पाळला गेला. यावेळी राजकमल चौकात आंदोलकांनी धुमाकूळ घातला. कार पेटवली, प्रतिष्ठानाची जाळपोळ करण्यात आली. काही धार्मिक स्थळाचे नुकसानही यावेळी करण्यात आले. यानंतर पोलीस प्रशासनाने अमरावतीत कर्फ्यु लागू केला आहे. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय बैठकही घेण्यात आली आहे.
लालखडी परिसर, चांदनी चौक, पठान चौक भागात आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अमरावती बंदला हिंसक वळण मिळाले.एवढेच नाही, तर नमुना गल्ली भागात तलवारी घेतलेले युवक घोषणाबाजी करीत होते, असेही समजते. या संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण असून कडक पोलीस बंदोबस्त आहे.
त्रिपुरा हिंसाचाराचे पडसात महाराष्ट्रात -
महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भात आणि मालेगावातही त्रिपुरा हिंसाचाराचे पडसाद दिसून आले. शुक्रवारी औरंगाबादमध्ये मुस्लीमबहुल भागात बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला होता. नांदेडमध्ये देगलूर नाका परिसरात जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला.
विदर्भात दुकानांची तोडफोड, दगडफेक -
अमरावतीत शुक्रवारी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. सुमारे ३० हजारांच्या जमावाने अनेक दुकाने व मॉलला लक्ष्य केले. दगडफेक करण्यात आली. हे सर्व अनपेक्षितपणे घडल्याने पोलिसांचीदेखील तारांबळ उडाली. पोलिसांनी सात तक्रारी नोंदवून घेत शेकडो आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मालेगावमध्ये पोलिसांचा लाठीचार्ज -
मालेगाव येथे शुक्रवारी सायंकाळी जमावाने दगडफेक सुरू केल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यासह लाठीचार्ज करावा लागला. दगडफेकीत पोलिसांच्या दंगानियंत्रण पथकाच्या वाहनाचे नुकसान झाले. यात 3 पोलीस अधिकाऱ्यांसह 7 जवानदेखील जखमी झाले.
काय आहे नेमकं प्रकरण -
नुकतेच, बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात त्रिपुरामध्ये हिंदू संघटनांकडून निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांदरम्यान मशिदींचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. यानंतर त्रिपुरात मोठ्या प्रमाणावर सांप्रदायिक हिंसाचार पाहायला मिळाला. या हिंसाचाराच्या विरोधात महाराष्ट्रातील अमरावतीसह अनेक शहरांमध्ये निदर्शने करण्यात आली.