महाराष्ट्रातील शेती लहरी हवामानाच्या ‘हॉटस्पॉट’वर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 07:33 PM2018-12-21T19:33:57+5:302018-12-21T20:02:30+5:30
हवेचे प्रदूषण, भुजल पातळी खालावणे, मृदा संधारण आणि पीक फेरपालट न केल्यामुळे सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या दुष्परिणांमध्ये महाराष्ट्र ‘हॉट स्पॉट’वर आहे.
पुणे : सातत्याने वाढणाऱ्या तापमानाचा परिणाम मृदा संधारणावर होत आहे. केवळ पाण्याच्या संवर्धनाबरोबरच मृदा संधारणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. वाढते प्रदूषण त्यामुळे हवेतील आद्रतेचे प्रमाण कमी झाले आहे. या सगळ्याचा परिणाम पिकांवर होत आहे. हवेचे प्रदूषण, भुजल पातळी खालावणे, मृदा संधारण आणि पीक फेरपालट न केल्यामुळे सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या दुष्परिणांमध्ये महाराष्ट्र ‘हॉट स्पॉट’वर आहे.
वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट या हवामान बदलांचा अभ्यास करुन शेतकऱ्यांमध्ये जागृतीचे काम करणाऱ्या संस्थेने नुकतेच २५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्ताने मांडण्यात आलेल्या निष्कर्षांची माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. या परिषदेला सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त क्रिस्पिनो लोबो, संचालक संदीप जाधव उपस्थित होते.
जाधव म्हणाले, भारत हवामान बदलासाठी हॉटस्पॉट आहे. येथील सुमारे ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या निसर्गावर आधारित आहे. त्यामुळे याठिकाणी तापमान आणि पर्जन्यमान्यातील बदलांचा सर्वाधिक धोका संभवतो. फक्त पावसावर आधारित शेती करणाऱ्या भागात महाराष्ट्राच्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक भाग व्यापलेला आहे. मात्र अशा ठिकाणी चिंताजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते. महाराष्ट्राने नोव्हेंबरमध्ये १३१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला तर कर्नाटकने १०० पैकी ७२ तालुक्यांत दुष्काळाचा अहवाल दिला.
लोबो यांनी सांगितले, सध्या हवामानाशी जुळवून घेणाऱ्या शेतीकडे वाटचाल करण्यासाठी सुधारित जलवापर पध्दती, जल अंदाजपत्रक तयार करणे, पूर्णपणे सेंद्रिय किंवा मर्यादित स्वरुपातील रासायनिक खतांचा वापर, माती आरोग्याची तपासणी आणि जमीन निकृष्ट होण्यावर नियंत्रण करण्याकरिता समग्र दृष्टिकोन आवश्यक आहे. तसेच वातावरणातील बदलाच्या परिस्थितीत नवीन आव्हानाना सामोरे जाण्याकरिता विद्यमान विस्तार सेवांची कार्यक्षमता वाढवणे गरजेचे आहे. प्रगतीच्या महत्वाकांक्षा मर्यादित ठेवण्याकरिता अधिक विकसित राष्ट्रांमधुन नागरिकांच्या आणि युवकांच्या मोहिमा, स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
काय करावे लागेल?
- लहान शेतकऱ्यांनी संबंधित समस्यांचे निराकरण करण्याकरिता आणि शेती उत्पन्न दुप्पट करण्यासाठी समुह / गट शेती आणि शेतकरी उत्पादक संस्थांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे.
- स्थानिक परिस्थिती आणि वेळेनुसार विस्तृत कृषी हवामानविषयक सल्ल्यांचा प्रसार करणे व स्वयंचलित निर्णय समर्थन प्रणालीचा वापर करुन असे सल्ले जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचिणे गरजेचे आहे.
- पावसाचा लहरीपणा आणि भुगर्भातील उथळ जलाशयांमध्ये झिरपणारा मर्यादित पाणीसाठा अशा भागातील पाण्याचे स्त्रोत व्यवस्थापित करणे फार महत्वाचे आहे.
- वातावरणातील बदलांच्या आव्हानांना विशेषत: भुजल वापर, जमिनीचा वापर, जलसंसाधन, शेती आणि हवामान, वित्त क्षेत्र, यांना एकत्रित आणि परिणामकारक प्रतिसाद देणे आवश्यक आहे.