शिवसेनेचं 'मिशन ८०'! ‘लाडकी बहीण कुटुंब भेट’ अभियान; CM एकनाथ शिंदे देणार हमीपत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 06:05 PM2024-09-05T18:05:21+5:302024-09-05T18:14:58+5:30
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून जास्तीत जास्त महिला मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी कुटुंबाला कार्यकर्ते भेट देणार आहेत.
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'लाडकी बहीण कुटुंब भेट' अभियान राबवलं जाणार आहे. या अभियानातून ५० हजार कार्यकर्ते १ कोटी महिलांपर्यंत पोहचणार आहे. राज्यातील ७०-८० मतदारसंघावर शिवसेनेने लक्ष केंद्रीत केले आहे. विरोधकांकडून सातत्याने लाडकी बहीण योजनेवर टीका होत असून निवडणुकीनंतर ही योजना बंद होणार असा प्रचार केला जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून या मतदार संघात प्रत्येक कार्यकर्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं हमीपत्र घेऊन १० लाडक्या बहिणींच्या घरी पोहोचेल अशी माहिती शिवसेनेचे उपनेते संजय निरुपम यांनी पत्रकारांना दिली आहे.
संजय निरुपम म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता शिवसेनेकडून राज्यात ‘लाडकी बहीण कुटुंब भेट’ अभियान राबवले जाणार आहे. या अभियानात शिवसेनेचे ५० हजार कार्यकर्ते १ कोटी महिलांना भेटून संवाद साधणार आहेत. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात होईल. राज्यातील ७० ते ८० विधानसभा मतदार संघांवर शिवसेनेने लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान तयार करण्यात आले आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी शिवसेना कार्यकर्ते लाडक्या बहिणींच्या घरी जातील. दररोज किमान ५ लाख आणि महिनाभरात ६० लाख लाडक्या बहिणींच्या घरी या अभियानातून संपर्क साधला जाईल असं त्यांनी सांगितले.
तसेच या अभियानासाठी सर्वच कार्यकर्त्यांच्या मोबाईलमध्ये विशेष ॲप दिलं जाईल. या ॲपमध्ये जिओ ट्रॅकिंग असून कार्यकर्त्याने केलेला संपर्क, तिथं दिलेला वेळ समजेल. लाडक्या बहिणींचा योजनेबाबतचा अनुभव आणि सूचनांची नोंद केली जाईल. गरज पडल्यास ॲपमधून नाव नोंदणी देखील केली जाईल अशी माहितीही निरुपमांनी दिली.
दरम्यान, बलात्कार आणि जीवे मारण्याचा गुन्हा असलेल्या कल्याणमधील साईनाथ तरे या माजी नगरसेवकाला पक्षात घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांना सुरक्षित बहिण योजना आठवली नाही का? शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्या गुन्हेगार तरेला पक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांना काय संदेश द्यायचा आहे असा सवाल संजय निरुपमांनी उपस्थित केला. त्याशिवाय सांगलीमध्ये पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळ्याला विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आहेत, मात्र उद्धव ठाकरे यांना आमंत्रण देण्यात आलेले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या षडयंत्राने उबाठाला सांगलीतून हद्दपार केले. लवकरच उबाठा महाराष्ट्रातून हद्दपार होईल. महाविकास आघाडी ही मतभेद विकास आघाडी बनली असून निवडणूक जवळ येताच आघाडी फुटेल असा दावाही त्यांनी केला.
शिवसेना ८० जागा लढवणार?
महायुतीत अद्याप जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत माहिती समोर आली नाही. परंतु या अभियानाच्या माध्यमातून शिवसेना ७० ते ८० विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करणार आहे त्यामुळे येत्या विधानसभेत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना ८० जागा लढवणार का अशी चर्चा सुरू आहे.