१७३ आमदारांनी घेतली शपथ, महाविकास आघाडीचे आधी बहिष्कारास्त्र; आज शपथ घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 06:20 IST2024-12-08T06:20:29+5:302024-12-08T06:20:54+5:30

सत्ताधारी महायुतीचे आमदार प्रचंड उत्साहात होते. शिंदेसेनेचे आमदार भगवा फेटा तर अजित पवार गटाचे  आमदार गुलाबी फेटा घालून विधानभवनात दाखल झाले.

Maharashtra Assembly Election: 173 MLAs took oath, Mahavikas Aghadi first boycott; Will take oath today | १७३ आमदारांनी घेतली शपथ, महाविकास आघाडीचे आधी बहिष्कारास्त्र; आज शपथ घेणार

१७३ आमदारांनी घेतली शपथ, महाविकास आघाडीचे आधी बहिष्कारास्त्र; आज शपथ घेणार

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांनाविधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विधिमंडळाच्या तीनदिवसीय  विशेष अधिवेशनाची सुरुवात शनिवारी झाली. पहिल्या दिवशी १७३ आमदारांनी  भारतीय संविधानाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली.  

सत्ताधारी महायुतीचे आमदार प्रचंड उत्साहात होते. शिंदेसेनेचे आमदार भगवा फेटा तर अजित पवार गटाचे आमदार गुलाबी फेटा घालून विधानभवनात दाखल झाले. सकाळी ११ वाजता हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी स्थान ग्रहण करताच राष्ट्रगीत व राज्यगीताने अधिवेशनाला सुरुवात झाली. कोळंबकर यांनी राज्यपालांकडून आलेला आदेश वाचून दाखवल्यानंतर अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाली.

कोळंबकर यांनी तालिका अध्यक्ष म्हणून भाजपचे चैनसुख संचेती, जयकुमार रावल, शिंदेसेनेचे आशिष जयस्वाल, अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे यांची निवड केली. त्यामुळे या चार जणांना सर्वप्रथम सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. या चौघांनी मराठीतून शपथ घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी शपथ घेतली. शिंदे यांनी शपथ घेताना बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे स्मरण केले. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देण्यात आल्या.

मविआ सभागृहाबाहेर
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी शपथ घेतल्यानंतर नाना पटोले यांचे नाव पुकारण्यात आले. त्यावेळी शपथ न घेता महाविकास आघाडीचे सदस्य सभागृहाबाहेर पडले. ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथ न घेण्याचा निर्णय जाहीर केला. रविवारी मविआचे सर्व आमदार शपथ घेणार आहेत.
मित्रपक्षाच्या आमदारांनी घेतली शपथ : मविआतील समन्वयाच्या अभावामुळे मित्र पक्ष समाजवादी पार्टी आणि माकपच्या आमदारांनी शपथ घेतली. सपाचे अबू आझमी, रईस शेख आणि माकपच्या विनोद निकोल यांना निरोपच पोहचला नव्हता, हे आमदारही मविआच्या निर्णयाबद्दल अनभिज्ञ होते.

Web Title: Maharashtra Assembly Election: 173 MLAs took oath, Mahavikas Aghadi first boycott; Will take oath today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.