Maharashtra Election 2019: 'कर्जमाफीचं विचारताच, मुख्यमंत्र्यांकडून 'भारत माता की जय'च्या घोषणा'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 02:49 PM2019-10-17T14:49:25+5:302019-10-17T15:02:38+5:30
कलम ३७० हटवले चांगले केलं, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. त्याबद्दल कोणत्या पक्षाने काय केलं
मुंबई - विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्यात आला असून, राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. फडणवीस यांच्या सभेत शेतकरी कर्जमाफी बद्दल विचारत असताना, मुख्यमंत्री मात्र भारत माता की जय, अशा घोषणा देत असल्याच्या आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. मूर्तिजापूर येथील सभेत ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच मतदारसंघात राजकीय नेत्यांच्या सभा होताना पहायला मिळत आहे. तर याच सभामधून सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप करत असल्याचे पाहायला मिळत आहे. बच्चू कडू यांनी गुरुवारी मूर्तिजापूर येथील सभेत बोलताना भाजप सरकारवर टीका करतांना मुख्यमंत्री फडणवीस यांचा समाचार घेतला.
मुख्यमंत्र्यांच्या सभेत एका शेतकऱ्याने उभा राहून कर्जमाफी झाली नाही म्हणून प्रश्न विचारला. मात्र मुख्यमंत्री त्याचे आयकत नव्हते, तर फक्त 'भारत माता की जय - भारत माता की जय' अशा घोषणा देत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला. भारत माता तुमची मात्र मलिदा यांचा असा खोचक टोला सुद्धा यावेळी बच्चू कडूंनी फडणवीस यांना लगावला.
कलम ३७० हटवले चांगले केलं, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. त्याबद्दल कोणत्या पक्षाने काय केलं असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर राज्यातील निवडणुका शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झाल्या पाहिजेत. मात्र तसे होत नसून, निवडणुकीत कलम ३७० च्या मुद्दा पुढे केला जात असल्याचे बच्चू कडू म्हणाले.