राष्ट्रवादीच्या दोन 'एबी' फॉर्मवरून पैठण मतदारसंघात नाट्यमय घडामोडी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 04:45 PM2019-10-04T16:45:12+5:302019-10-04T16:55:40+5:30
शुक्रवारी दत्ता गोर्डे यांनी एबी फॉर्म सुद्धा निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा केला आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी भरण्याचा आजच्या शेवटच्या दिवशी अनेक मतदारसंघात नाट्यमय घडामोडी पाहायाला मिळाल्या. त्याचप्रमाणे पैठण विधानसभा मतदारसंघात सुद्धा राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. माजी आमदार संजय वाघचौरे व भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले दत्ता गोर्डे या दोन्ही नेत्याकडून आपल्याला राष्ट्रवादी पक्षाकडून एबी फॉर्म मिळाला असल्याचा दावा केला जात आहे. मात्र दोन्ही नेत्यांचा दाव्यानंतर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
पैठण मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाकडून माजी आमदार संजय वाघचौरे यांची उमेदवारी निश्चित समजली जात होती. मात्र ऐनवेळी भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी दाखल केली होती. तर शुक्रवारी दत्ता गोर्डे यांनी एबी फॉर्म सुद्धा निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा केला आहे.
मात्र दुसरीकडे आता संजय वाघचौरे यांच्याकडून सुद्धा आपल्याला राष्ट्रवादी पक्षाकडून एबी फॉर्म मिळाला असल्याचा दावा केला जात आहे. त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाकडून नेमकी अधिकृत उमेदवारी कुणाला याची चर्चा पहायला मिळत आहे.तर दोन्ही नेत्याकडून होत असलेल्या दाव्यांंमुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे पहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी पक्षाकडून मला अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. तसेच एबी फॉर्म सुद्धा पक्षाने दिला असून, निवडणूक अधिकाऱ्यांकडे मी जमा सुद्धा केला आहे. वाघचौरे जर एबी फॉर्मचा दावा करीत असतील तर त्यांनी तो दाखवावा. दत्ता गोर्डे ( इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी )