मनसेचा 'दस का दम'; राज ठाकरेंच्या इंजिनाला इंधन देणारे आकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 21:11 IST2019-10-26T21:05:38+5:302019-10-26T21:11:15+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल सत्ताधारी पक्षाची काहीशी निराशा करणारे तर विरोधी पक्षांचे मनोबल वाढवणारे ठरले आहेत.

मनसेचा 'दस का दम'; राज ठाकरेंच्या इंजिनाला इंधन देणारे आकडे
मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल सत्ताधारी पक्षाची काहीशी निराशा करणारे तर विरोधी पक्षांचे मनोबल वाढवणारे ठरले आहेत. एकीकडे भाजपा आणि शिवसेना महायुतीची सत्ता आली तरी त्यांचे सभागृहातील संख्याबळ घटले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे संख्याबळ बऱ्यापैकी वाढले आहे. राज ठाकरे यांच्या मनसेसाठीही ही निवडणूक किंचीत दिलासा देणारी ठरली आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून राजू पाटील यांच्या रूपात मनसेचा आमदार विधानसभेत पोहोचला आहे. सोबतच इतर काही ठिकाणी मिळालेली मते मनसेचा आत्मविश्वास वाढवणारी आहेत.
मनसेला केवळ एका जागेवर विजय मिळाला असला तरी राज्यातील अन्य काही मतदारसंघात मनसेचे उमेदवार दुसऱ्या स्थानी राहिले आहेत. संतोष नलावडे (शिवडी), संदीप देशपांडे (माहीम), नयन कदम (मागाठाणे), संदीप जळगावकर (भांडूप पश्चिम) हर्षला चव्हाण (मुलुंड प.), अविनाश जाधव (ठाणे), मंदार हळबे (डोंबिवली) शुभांगी गोवरी (भिवंडी ग्रामीण), किशोर शिंदे (कोथरूड) या उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्याबरोबरच काही मतदारसंघात मनसेचे उमेदवार तिसऱ्या स्थानी राहिले.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाला १०५ जागांवर समाधान मानावे लागले. तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. शिवसेनेच्या जागा कमी झाल्या असल्या तरी भाजपाला निर्णायक यश न मिळाल्याने शिवसेनेच्या हाती सत्तेच्या चाव्या लागल्या आहेत.
दरम्यान, निकालांनंतर शिवसेना आणि भाजपामध्ये सत्तेच्या चढाओढीवरून कुरघोडी सुरू झाली आहे. तसेच शिवसेना भाजपाला सत्तावाटपाच्या ५०-५० फॉर्म्युल्याची सतत आठवण करून देत आहे.