आदित्य ठाकरेंसोबतच उद्धव ठाकरेंकडून आणखी एका युवा नेत्याचं कौतुक; जाणून घ्या 'तो' कोण आहे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 10:58 AM2019-10-07T10:58:17+5:302019-10-07T11:00:53+5:30
Maharashtra Election 2019 आदित्य ठाकरेंसोबत 'त्या' खासदाराचं उद्धव यांच्याकडून कौतुक
मुंबई: यंदाची विधानसभा निवडणूक ठाकरे घराण्यासाठी ऐतिहासिक आहे. ठाकरे कुटुंबातील व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आहे. निवडणुकीपासून कायम दूर राहणाऱ्या ठाकरे कुटुंबातील आदित्य वरळीतून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे वरळी विधानसभा मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेल्या मुलाखतीत त्यांचं तोंडभरुन कौतुक केलं. उद्धव यांनी आदित्य यांच्यासोबतच शिवसेनेच्या एका खासदारावरही स्तुतीसुमनं उधळली.
आदित्य ठाकरेंना शिवसैनिकांवर लादण्यात आलेलं नाही. तर त्यांना शिवसैनिकांना प्रेमानं स्वीकारलं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. 'आदित्य ठाकरेंनाशिवसेनाप्रमुखांकडूनच बाळकडू मिळालंय. मी जेव्हा कार्य सुरू केलं, तेव्हा आदित्य खूप लहान होता. तो सतत आज्याभोवती असायचा. त्यांच्याकडे बसून बाळासाहेब कोणाशी काय, कसं बोलतात ते ऐकायचा. हे सगळं करत करत तो मोठा झाला. वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षापासून तो माझ्यासोबत आणि बाळासाहेबांसोबत निवडणुकीच्या दौऱ्यांवरसुद्धा यायला लागला. माझ्यासोबत त्यानं ग्रामीण भाग पाहिला आहे. आतासुद्धा त्यानं 'जनआशीर्वाद यात्रे'च्या माध्यमातून शंभर-सव्वाशे मतदारसंघ पालथे घालतेत,' अशा शब्दांमध्ये उद्धव यांनी आदित्य यांचं कौतुक केलं.
शिवसेनेतील युवाशक्तीवर बोलताना उद्धव यांनी आणखी एका तरुण खासदाराचा आवर्जून उल्लेख केला. 'तुम्ही युवाशक्तीला कधी संधी देणार आहात? केवळ माझा मुलगा म्हणून मी हे बोलत नाही. पण हातकणंगलेचा खासदार धैर्यशील मानेचं उदाहरण घ्या. किती छान वाटतो. बोलतो चांगला. तडफदार आहे. तरुण आहे,' अशा शब्दांमध्ये उद्धव यांनी मानेंची स्तुती केली. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींचा जवळपास लाखभर मतांनी पराभव केला. २००९ आणि २०१४ मध्ये शेट्टींनी हातकणंगलेमधून विजय मिळवला होता. मात्र माने यांनी २०१९ मध्ये शेट्टींचा पराभव करत त्यांची हॅट्ट्रिक रोखली.