१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 16:48 IST2024-11-07T13:10:25+5:302024-11-07T16:48:48+5:30
नाशिक मर्चंट बँकेत घडलेल्या या प्रकाराने नाशिकमध्ये गोंधळ माजला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी हे पैसे कुठून, कुणाकडून कसे आले याचा शोध आता घेतला आहे.

१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
नाशिक - राज्यात विधानसभा निवडणुकीचं वारं जोरदार वाहत आहे. त्यात राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. निवडणुकीच्या काळात भरारी पथकाकडून ठिकठिकाणी नाकेबंदी लावून तपासणी केली जाते. त्यात बेकायदेशीर दारुसाठा, कोट्यवधीच्या रोकड जप्त झाल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. परंतु नाशिकमध्ये घडलेल्या प्रकाराने सगळेच हैराण झाले आहेत.
नाशिकमध्ये बेरोजगार तरुणांच्या खात्यात १२५ कोटी रुपये जमा झाल्याचा प्रकार घडला आहे. नाशिक मर्चंट बँकेच्या मालेगाव शाखेत १२ खात्यांमध्ये एवढी मोठी रक्कम जमा झाली आहे. अचानकपणे खात्यात आलेल्या रक्कमेमुळे तरुणही गोंधळात पडले आहेत. खात्यात हे पैसे कुणी टाकले याबाबत तरुणांना कुठलीच कल्पना नाही. मात्र ऐन निवडणुकीच्या काळात घडलेल्या या प्रकारामुळे अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. काही तरुणांनी स्थानिक नेते मंत्री दादा भुसे यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर या प्रकरणाची पोलीस तपास करत आहेत.
१२५ कोटी इतकी रक्कम बनावट कंपन्यांचा आर्थिक व्यवहार आहे का अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे नाशिकच्या मालेगावमध्ये खळबळ माजली आहे. गेल्या १५-२० दिवसांत बँकेच्या शाखेत १२ खात्यांमध्ये शंभर ते सव्वाशे कोटी आर्थिक व्यवहार झाला आहे. या तरुणांच्या नावाने बनावट कंपन्या तयार करून कुणाच्या नावे १० तर कुणाच्या नावे १५ कोटी रक्कम जमा करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सिराज अहमद या व्यक्तीने या तरुणांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, सह्या घेत मालेगाव बाजार समितीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कागदपत्रे घेतली होती. त्यानंतर हा प्रकार घडल्याचे समोर आले.
या १२ तरुणांनी मंत्री दादा भुसे यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणत तपासाला सुरुवात झाली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावर अपर पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देण्यात आली असून ही रक्कम कुठून आली, त्यामागे कोण होते या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत या खात्यांवरून १५ दिवसांत १०० कोटींहून अधिक आर्थिक उलाढाल होणे हे सगळे गौडबंगाल असल्याची चर्चा आहे.