"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 04:31 PM2024-10-27T16:31:38+5:302024-10-27T16:33:44+5:30
Maharashtra Assembly Election 2024: राज्यातील भाजपाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटातील उमेदवारांबाबत एक सूचक विधान केलं आहे. ठाकरे गटाच्या पहिल्या यादीमधील १७ उमेदवार हे आमचे नेते आहेत, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडीने आपल्या बहुतांश उमेदवारांची घोषणा केली आहे. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत राज्यातील समिकरणं बदललेली असल्याने सर्वच पक्षांमध्ये नाराजी आणि बंडखोरीला उत आला आहे. त्यामुळे पक्षांतरही मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटातील उमेदवारांबाबत एक सूचक विधान केलं आहे. ठाकरे गटाच्या पहिल्या यादीमधील १७ उमेदवार हे आमचे नेते आहेत, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
एनडीटीव्हीने आयोजित कार्यक्रमामध्ये मुलाखतीदरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जेव्हा आपण तडजोड करतो, तेव्हा काही लोकांवर अन्याय होतो. त्याचं दु:खही होतं. कारण पहिली अडीच वर्ष आम्ही २८८ जागांवर लढण्याची तयारी करत होतो. अनेक नेते आम्ही तयार केले. परवा मी पाहत होतो की, उद्धव ठाकरे यांनी जी पहिली यादी प्रसिद्ध केली. त्यामध्ये १७ नेते हे आमचे आहेत. ते आमच्या पक्षातील नेते होते. आता आजच्या काळात राजकारणामध्ये कुणी थांबायला तयार नाही, त्यामुळे त्यातले काही जण सांगतात की साहेब, आता आम्ही एवढी तयारी केली आहे आणि तुम्ही उमेदवारी मित्रपक्षाला दिली. आम्ही निष्ठावंतच आहोत. मात्र आता आम्ही संधी मिळेल तिथून लढतो, अशी माहिती त्यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकारणामध्ये आपल्याला व्यावहारिक असावं लागतं. तसेच जमिनीवरील परिस्थिती काय आहे, हे समजूनच निर्णय घ्यावे लागतात. आज तीन पक्ष मिळूनच आम्हाला विजय मिळणार आहे, अशी जमिनीवरील परिस्थिती आहे. एकट्या भाजपाच्या भरोशावर विजय मिळू शकणार नाही. तीनही पक्षांची बेरीज करून आम्ही विजयापर्यंत पोहोचतो आहोत. भाजपा हा महायुतीमधील सर्वात मोठा पक्ष आहे, सर्वाधिक मतं भाजपाकडे आहेत हे खरं आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला ते पक्ष हवे आहेत, त्यांची मतं हवी आहेत. मात्र त्यांना आम्ही जागा देणार नाही, असं म्हणता येत नाही. तडजोड करावीच लागले, असंही त्यांनी सांगितलं.
बाकी तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राची निवडणूक अशी आहे की, येथे सहा प्रमुख पक्ष आहेत. म्हणजे एवढे पक्ष आहेत की प्रत्येक कलाकाराला काही भूमिका आहे. इतके सिनेमे बनत आहेत की, प्रत्येकजण जो स्वत:ला हिरो समजतो. तो ज्या सिनेमात काम मिळेल तिकडे चाललाय. पण, काही लोकांच्या पक्ष सोडून जाण्याबाबत मला दु:खही आहे. मी त्यांची नावं घेणार नाही. पण युतीच्या राजकारणातील अपरिहार्यतेमुळे काही चांगली मंडळी आमच्यापासून दूर गेली, अशी खंतही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.