५ जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवू, मविआच्या सभेत ठाकरे यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 12:40 PM2024-11-07T12:40:51+5:302024-11-07T12:41:20+5:30
Maharashtra Assembly Election 2024: राज्यातील जनतेला सर्व प्रकारचे कर लावून महागाईच्या खाईत लोटणाऱ्या सरकारला सत्तेतून खाली खेचून आम्ही पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर कायम स्थिर ठेवणार आहोत, असे आश्वासन महाविकास आघाडीचे नेते आणि उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले.
मुंबई - राज्यातील जनतेला सर्व प्रकारचे कर लावून महागाईच्या खाईत लोटणाऱ्या सरकारला सत्तेतून खाली खेचून आम्ही पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर कायम स्थिर ठेवणार आहोत, असे आश्वासन महाविकास आघाडीचे नेते आणि उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. ते बुधवारी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या स्वाभिमान सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी महागाईवर आवर घालणे यांना जमलेच नाही, असे म्हणत राज्य सरकार आणि महायुतीवर जोरदार टीका केली.
स्वाभिमान सभेत मविआच्या सर्व प्रमुख नेत्यांची भाषणे झाली. महिलांसाठी असलेली योजना आम्ही केवळ चालू ठेवणार नाही तर त्यात अधिक भर घालणार असल्याचेही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. ठाकरे पुढे म्हणाले की, आमचे सरकार आल्यानंतर आम्ही राज्यातील मुलांना मोफत शिक्षण देणार असून आम्ही जे करतो तेच बोलतो. प्रत्येक बेरोजगार तरुणाला दर महिन्याला चार हजार रुपयांची मदत करणार असून आता एक तरुण बेरोजगार होईल, त्याचे निकष ठरवावे लागतील, असा टोलाही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना लगावला.
ठाकरे म्हणाले...
संविधान वाचवायचे असेल तर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणे गरजेचे आहे.
धारावी अदानीच्या घशात घालायला सरकार निघाले असून सरकार आल्यानंतर ज्या सवलती अदानींना दिल्या आहेत, ते कॉन्ट्रॅक्ट सर्वांत आधी रद्द करणार असून धारावीकरांना जिथल्या तिथे उद्योगाच्या सोयीसह घर देणार.
ही निवडणूक केवळ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची नाही तर मुंबईचे सुरू असलेले अदानीकरण थांबवण्यासाठी ही निवडणूक आहे.
फडणवीसांनी मुंब्र्यात मंदिर बांधणार का, म्हणून आम्हाला आव्हान दिले आहे. मुंब्रा ठाणे जिल्ह्यात येतो. त्याच्या जिल्ह्यात जर तुम्हाला छत्रपतींचे मंदिर बांधणे अवघड वाटत असेल तर गद्दाराला डोक्यावर कशाला घेतला?
शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचे कर्ज माफ : शरद पवार
राज्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले असून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात महायुती सरकारने फसवणूक केली आहे. आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही सर्व शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करू तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये परतावा दिला जाईल, असे आश्वासन राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी दिले.
बळाचा वापर करून निवडणुका जिंकता येणार नाहीत : पटोले
महायुती सरकार हे अधिकाऱ्यांचा गैरवापर करत असून पोलिसी बळावर निवडणुका जिंकता येतील, असा यांचा भ्रम असल्याचे पटोले म्हणाले. राहुल गांधी यांनी संविधान जनतेसमोर दाखवल्यानंतर संविधानाच्या पुस्तकाच्या लाल रंगाबाबत हा नक्षलवाद्यांचा रंग असल्याची टीका फडणवीस आणि भाजप यांनी केली आहे. मात्र, लाल रंगाला हिंदू धर्मात मोठे महत्त्व असून हा आपल्या क्रांतीचा रंग आहे. त्यामुळे या रंगाला नक्षलवाद्यांचा रंग म्हणून हिणवू नये, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
अचानक लाइट गेली
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत असताना अचानक सभास्थळावरील वीज खंडित झाली. यामुळे नाना पटोले यांना पाच मिनिटे आपले भाषण थांबवावे लागले. अखेरीस पटोले यांनी ध्वनिक्षेपकाशिवाय भाषण सुरू केले.
नेत्यांच्या आगमनामुळे गोंधळ
सभा सुरू असताना व्यासपीठावर मुख्य नेते येत होते. जितेंद्र आव्हाड यांचे भाषण सुरू असताना राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांचे व्यासपीठावर आगमन झाल्याने आव्हाड यांना भाषण थांबवावे लागले. तर सभा सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले. मात्र, त्यांच्या आगमनाचे स्वागत करण्यात आले नाही.
राहुल, उद्धव यांचा जयघाेष
सभास्थळी काँग्रेस आणि उद्धवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात होते. कारण कार्यकर्त्यांमधून राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा सातत्याने दिल्या जात होत्या. सभेला हजारोंच्या संख्येने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली.