विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 04:48 PM2024-10-16T16:48:57+5:302024-10-16T17:02:15+5:30

Maharashtra Assembly Election 2024: महादेव जानकर (Mahadev jankar) यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. तसेच राष्ट्रीय समाज पक्ष (Rashtriya Samaj Paksha) महाराष्ट्रातील सर्व २८८ जागांवर स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची माहिती महादेव जानकर यांनी केली आहे. 

Maharashtra Assembly Election 2024: A big blow to the Mahayuti ahead of the assembly elections, Rashtriya Samaj Paksha the old ally left the support of the BJP, will fight on its own  | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन एक दिवस उलटत नाही तोच राज्यातील सत्ताधारी महायुती आणि भाजपाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर जुन्या मित्रपक्षाने भाजपाची साथ सोडली आहे.  महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. तसेच राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रातील सर्व २८८ जागांवर स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची माहिती महादेव जानकर यांनी केली आहे. 

महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष हा २०१४ च्या आधीपासून भाजपासोबत महायुतीमध्ये होता. अनेकदा दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झाले तर जानकर महायुतीसोबत कायम होते. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांना महायुतीने परभणी लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी दिली होती. मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान, महादेव जानकर हे महायुतीमध्ये नाराज असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत होत्या. अखेर आज त्यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 

महायुतीमधून बाहेर पडण्याच्या निर्णयाबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना महादेव जानकर यांनी सांगितले की, माझ्याशी महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्यापैकी कुणीही संपर्क साधलेला नाही. मी कुणावरही नाराज नाही. मी माझ्या पक्षाच्यावतीने विधानसभेच्या २८८ जागांवर लढण्याची तयारी करत आहे. आम्ही आमच्या ताकदीवर स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. लोकसभेला महायुतीने आम्हाला एक जागा दिली होती. त्याबद्दल आम्ही महायुतीमधील तिन्ही पक्षांचे आभार मानतो. मात्र त्यानंतर आता आपण आपल्या पक्षाची ताकद वाढवली पाहिजे, आमच्याही पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, पंतप्रधान झाला पाहिजे, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महादेव जानकर यांनी दिली. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: A big blow to the Mahayuti ahead of the assembly elections, Rashtriya Samaj Paksha the old ally left the support of the BJP, will fight on its own 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.