"सेंच्युरी मारण्यासाठी तेवढ्या जागा तरी लढवा’’, शिंदे गटाचा संजय राऊतांना खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 12:50 PM2024-10-23T12:50:47+5:302024-10-23T12:51:59+5:30
Maharashtra Assembly Election 2024: शिवसेना ही या मैदानातील अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे शिवसेनेला सेंच्युरी मारावीच लागेल, फक्त जागावाटपात नाही, तर विजयामध्येही शिवसेनेने सेंच्युरी मारावी असं लोकांना वाटतं, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यावरून आता शिवसेना शिंदे गटाने संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
महाविकास आघाडीमधील जागावाटप अंतिम टप्प्या आलं असताना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ठाकरे गटाला मिळणाऱ्या जागांबाबत मोठं विधान केलं होतं. शिवसेना ही या मैदानातील अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे शिवसेनेला सेंच्युरी मारावीच लागेल, फक्त जागावाटपात नाही, तर विजयामध्येही शिवसेनेने सेंच्युरी मारावी असं लोकांना वाटतं, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यावरून आता शिवसेना शिंदे गटाने संजय राऊत यांना टोला लगावला आहे. सेंच्युरी मारण्यासाठी तेवढ्या जागा तरी आधी लढवा, असा टोला शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले की, सेंच्युरी मारण्यासाठी तेवढ्या जागा तरी लढवा. कसली सेंच्युरी मारताय. प्रसारमाध्यमांतून ज्या बातम्या येताहेत त्यानुसार यांना ९५ जागा मिळणार आहेत आणि सेंच्युरी १०० ला म्हणतात, हे तरी त्यांना समजलं पाहिजे. की ९५ जागा लढून ९५ जागा जिंकणार आहेत. हा चमत्कार फक्त संजय राऊतच करू शकतात. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. या सगळ्यांची मिळून सेंच्युरी झाली. तरी ती १००ची होते. बाकी १८८ जागांवर आम्ही आहोत, याचं भान त्यांनी राखलं पाहिजे. म्हणून येणारी सत्ता ही महायुतीचीच असणार आहे, असा दावाही संजय शिरसाट यांनी केला.
शिवसेना ही या मैदानातील अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे शिवसेनेला सेंच्युरी मारावीच लागेल. तसेच शिवसेनेने सेंच्युरी मारावी, अशी लोकांची अपेक्षा आहे. फक्त जागावाटपात नाही, तर विजयामध्येही शिवसेनेने सेंच्युरी मारावी, असं लोकांना वाटतं. शिवसेना हा महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारा पक्ष आहे. मराठी माणसाचा पक्ष आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे. त्यामुळे शिवसेनेने सेंच्युरी मारावी, अशी ११ कोटी जनतेची अपेक्षा आहे, असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत जी माहिती समोर येत आहे. त्यानुसास शिवसेना ठाकरे गटाला ९५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस १०५ आणि शरद पवार गट हा ८५ जागांवर लढणार असल्याचा दावा केला जात आहे.